दिवाळी सण हा प्रकाश वा दिव्यांचा सण भारतभर साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे. दिपावलीचे महत्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.जीवनातला अंधार दूर सारुन प्रकाशाकडे वाटचाल करणं हेच खरे प्रकाश पर्व आहे.
अंधार म्हणजे आसक्ती आणि मोह यांचा अंधकार.दुःख,वेदना,अज्ञान,अंधश्रद्धा अस्वस्थता व अनारोग्य,विफलता,नैराश्य हे अंधाराचे लक्षण म्हणता येईल.काम,क्रोध,माया,लोभ ,अहंकार ,ईर्शा ,द्वेष या गर्तेत आकंठ बुडणारा व्यक्तीच्या जीवनात अंधकार निर्माण होत असतो. हा अंधार आपणास जीवन सुखापासून दूर घेवून जातो. या अंधारातून मुक्त होवून प्रकाश पर्वाचे स्वागत करणा-या दिवाळीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
जीवन सुंदर आहे.ते सुंदरतेने जगता यावं यासाठी स्वयंप्रकाशित व्हावं लागतं. अंधार नाहीसा करण्यासाठी अंतरंग स्वच्छ व शुद्ध असावे लागते.प्रकाश हे एक तत्व आहे.हे तत्व आत्मसात करावं लागतं. प्रकाश म्हणजे चैतन्य,उत्साहाची उधळण ही अनुभूती आहे. ती अनुभवता आली पाहीजे. मन मंदिराच्या गाभा-यात एक दिवा प्रज्वलीत करुन स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय जीवनात उजेड पडणार नाही.उघड्या डोळ्यासमोरचा अंधार कदापि दूर होणार नाही.
स्वयंप्रकाश ज्ञान-ईश्वराची ओळख करुन देतो. ही ओळख सर्वांना सज्ञान बनविते. सज्ञानी हाच प्रकाशाचे महात्म्य ओळखू शकतो. ज्ञानप्रकाश म्हणजे यशोशिखरावर पोहोचविणारा ,सुख समृद्धीचा प्रशस्त सन्मार्ग होय. स्वयंप्रकाशित होणं याचा अर्थ बरे- वाईट,सत्य -असत्य,ज्ञान-अज्ञान,श्रद्धा-अंधश्रद्धा,सुख- दुःख,हित -अहित ,वेदना आणि संवेदना याची जाणिव होणं असा आहे.स्वतःसाठी सारेच जगत असतात परंतू दुस-यासाठी जगता आलं पाहीजे. असहाय्य,वंचितांचे मदतीला धावून जाण्यात खरा पुरुषार्थ आहे.दुस-याचं सुख असो वा दुःख हे आपलं समजण्याची संवेदना निर्माण होत मनुष्य आणखी तेजस्वी होते. या प्रखर तेजाने तयांचे जीवन उजळून जाते. सद्याचं युग हे विज्ञान युग म्हटले जाते.या युगातील मानव निर्मित झगमगाटात आपण सारे वाहून गेलो आहोत...रात्रीचा दिवस करण्याची किमया आपल्याला मोहीत करुन जाते. कृत्रिम असलेल्या अनेक साधने आपल्याला निसर्ग निर्मित पेक्षाही मोठ्या वाटतात.वा-याची झुळूख पेक्षाही पंख्याची हवा ,वातानुकुलीत हवेत आपणाला आनंदायी वाटते.अंधार दूर करण्याच्या शोधात आपण सुखाचा अनुभव घेत सुर्य दर्शनही दुर्मिळ व्हावं अशा झगमगाटात आपण जगतो आहोत. जल समृद्धीचा नाहीसी करीत विद्युत प्रकल्पात आपणास प्रसन्नता वाटू लागली आहे.नव्या नव्या प्रयोगातून सारं अंतरिक्ष काबिज करण्याच्या मोहात मनुष्य सुपर न झाला आहे.वास्तविकता ही आहे की आपण निसर्गावर हा अन्याय करित आहोत. हे सुर्यप्रकाशा एवढे सत्य कुणी नाकारु शकेल कां?
मी अविवेकाची काजळी।फेडूनि विवेक दिप उजळी।जै योगीया पाहीजे दिवाळी निरंतर।।
वरील श्री ज्ञानेश्वरीतील एक ओवी या ठिकाणी प्रकाश टाकणारी आहे
हे सारे विज्ञान वरदान ठरण्यापेक्षा शाप ठरले की काय? असा यश्चप्रश्न ठाकला आहे.भौतिक सुख हेच जीवनाचं ध्येय ठरल्याने जीवनातला प्रकाश काळवंडला आहे हे वास्तव चित्र दिसून येते..
सुर्ये आधिष्ठीली प्राची |जगा जाणिव दे प्रकाशाची ||तैसी श्रोतया ज्ञानाची |दिवाळी करी || संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकाशाचे सत्व सांगणारी ही ज्ञानेश्वरीतील ओवी अधोरेखीत करावीशी वाटते.
अज्ञान,अंधश्रद्धा ,असत्याच्या अंधकारातून मुक्त होत सर्वांनी स्वयंप्रकाशित व्हावं आणि दुस-यांनाही अंधारातून मुक्त करुन प्रकाशीत करावं यासाठी प्रकाश मार्गाचे वाटेकरी व्हावे"तमसो मा ज्योतिर्गमय..!" हेच खरे दिपावलीचे प्रकाश पर्व आहे.- नंदकिशोर हिंगणकरआकोट जि.अकोला