रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
- इस्लामिक महिने चांद्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरुवात देखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते त्याच्या दुसºया दिवसापासून रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे म्हणूनच मुस्लीम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग) चे दार उघडले जाते व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जात आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे त्यांनी पुढे व्हावे आणि जे लोक वाईट कृत्य करणारे आहेत त्यांनी त्यापासून लांब थांबावे.
कुरआन मानव जातीला मार्गदर्शक ग्रंथ
- - इस्लाम धर्माचा सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्यावर अल्लाहकडून उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शक आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरित झाला.
- - रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानव जातीकरिता मार्गदर्शक व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (दिव्य कुरआन २:१८५)
- - जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरित करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायामध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
- - कुरआन हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या आतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली आहे व याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे - साडेचौदाशे वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्र्यात कोणताही बदल झालेला नाही. आणि ईन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.