- डॉ. भालचंद्र ना. संगनवार
देहाची व्याख्या व त्याचे अस्तित्व अत्यंत मोजक्या शब्दात यापेक्षा चांगले सांगता येणे अवघडच. मानवी देह हा अत्यंत नाशिवंत असून क्षणोक्षणाने तो काळाच्या स्वाधीन होत आहे. याच मानवी देहावर किती प्रेम केले जाते, हे आपण अनुभवतोच. भौतिक सुखाची लालसा या नश्वर देहांची चोचले पुरविण्यासाठी केली जाते. आजच्या कालखंडात प्रत्येक व्यक्ती अमरत्वाचा पट्टा बांधून आल्याच्या आविर्भावात वागत असून व्यक्तिकेंद्रित विचार प्रबळ होत आहेत. व्यक्तिपूजा वाढत असून क्षणाक्षणाने कमी होणाऱ्या आयुष्याचे महत्त्व विसरत चाललो आहोत. ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे...’ या वाक्याचा जवळ जवळ विसर पडल्याचे दिसून येत आहे. जन्माला आल्यानंतर उपजीविकेचे साधन म्हणून अर्थार्जन करावे लागते हे खरे आहेच; परंतु जन्माचे सार्थक होण्याकरिता व समाजाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने आपले काही कर्तव्य आहे, हेदेखील विसरून चालणार नाही.
‘देह प्रपंचाचा दास... सुखे करो काम...’ हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु त्यासोबतच ‘तुझे रुप चित्ती राहो... मुखी तुझे नाम...’ अशी याचना संत गोरा कुंभार यांनी केली, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. निष्काम भक्तीचे उत्तम उदाहरण संत गोरोबांनी दिले आहे. देहभान विसरून आत्मा ईश्वरचरणी समर्पित केला असून प्रपंच आणि परमार्थ या दोघांत किंचितही गफलत होऊ दिली नाही. ईश्वर प्राप्तीचा धोपट मार्ग हा भक्ती आणि नामस्मरण आहे. सर्वव्यापी ईश्वर हा अनेक रुपांत एकरूप असून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हीच खरी शिकवण अंगीकारणे आवश्यक आहे.
प्रपंचात आसक्ती जागृत राहणे म्हणजे प्रत्यक्षात अग्नीस आलिंगण देणे असे आहे. प्रपंच करावा नेटका याचा गूढ अर्थच असा आहे की, या मानवी देहाच्या माध्यमातून ईश्वररूपी चेतनेस विलीन होणे शक्य आहे. प्रपंचाने सुखी झाला... ऐसा ना कुणी ऐकला वा देखिला... असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. मानवी देहाने सजविलेल्या संसाररूपी रथास अनेक अडचणी आणि संकटे आहेतच. परंतु या रथाचा सारथी विवेकरूपी ईश्वर झाल्यास सद्गतीस प्राप्त होणे सहज शक्य आहे.
कोण दिवस येईल कैसा...नाही देहाचा भरवसा...इतके स्पष्ट असतानादेखील माणसे आपपर भाव सोडण्यास तयार नाहीत. मानव रूपाने मिळालेली संधी वाया घालविली जाते. संत कबिरांनी देखील मानवी देहाबाबतीत अगदी सुंदर विचार दोह्यात मांडले आहेत. ते म्हणतात...
काह भरोसा देह का, बिनस जात छान मारही ।सांस सांस सुमिरन करो, और यतन कुछ नाही ।।
संत कबीर म्हणतात, या देहाचा यत्किंचितही भरवसा नाही. कारण याचा अंत केव्हाही होऊ शकतो. परंतु प्रत्येक क्षण आणि श्वासागणिक केलेले ईश्वर स्मरण माणसास अमरत्व व देवरूपास विलीन करू शकतो. ईश्वररूपी विधात्याचे स्मरण माणसास या ८४ लक्ष फेऱ्यातून मुक्त करू शकतो. परंतु आपली ईश्वरप्राप्तीची आसक्ती उदात्त असावी लागते. जन्मभराच्या श्वासाइतके मोजीयले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम... हे गीत आपणास ईश्वरप्राप्तीचा संदेश देऊन जाते. मानवी देह असो वा कोणत्याही भूतलावरील सजीव यांनी कितीही प्रयत्न केले तरी मृत्यू हा अटळ आहेच. तेव्हा श्वाश्वत काय तर ती कीर्ती मानवाची कीर्ती शतकानुशतके अमर राहते. जर त्यांनी ईश्वरप्राप्तीचा व समाजोद्धारकाचा मार्ग स्वीकारला तर अन्यथा किती आले किती गेले प्रमाणे आपली जन्म-मरणाची वारी अटळ आहेच. अत्यंत निर्विकारपणे भक्तपंथांची स्वीकृती केली तरच अगाध शक्तिदात्याच्या समिप पोहोचण्याचा मार्ग सापडतो.
( लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )