भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना आणि विविध प्रकारच्या इच्छा-आकांक्षा अंत:करणात सदैैव जपत यज्ञादी कर्मे करतात त्यांना देवतांची प्रार्थना करावी लागते, आपले साध्य पूर्ण व्हावे म्हणून याचना करावी लागते. पुण्य संपादन करीत स्वर्गलोकाची प्राप्ती करून घ्यायची असते. परंतु या सकाम वृत्तीने उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांच्या हे लक्षात येत नाही की या विविध देवतासुद्धा माझीच रूपे आहेत. परंतु जे परमभक्त केवळ माझीच उपासना करतात, मलाच शरण येतात, केवळ माझाच आश्रय घेत, निष्काम भावनेने माझी पूजा करतात त्यांना माझी याचना कधीच करावी लागत नाही. मी त्यांची मोक्षाची इच्छा स्वत:च पूर्ण करतो.
अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते!तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम।।
भगवंत अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले की, ‘‘पार्था, माझी जी अन्यन्यभावाने भक्ती करतात, माझ्याच उपासनेत अखंड दंग असतात, ज्या माझ्या परमभक्तांना फक्त माझीच प्राप्ती करून घ्यायची इच्छा असते, जे सतत माझेच चिंतन करतात, माझ्या नामातच जे अखंड दंग असतात ना, त्यांना जे प्राप्त करून घ्यायचे आहे ती कामना पूर्ण करीत त्या त्यांच्या इच्छेचे रक्षण मीच करतो. त्यासाठी त्यांना माझी याचना करावी लागत नाही. त्यांचा योगक्षेम मीच सांभाळतो आणि मोक्षापर्यंत त्यांचा सांभाळ करतो, पार्था... प्रत्येक भक्ताने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपले संपूर्ण आयुष्य, आपले सुखदु:खाने व्याप्त नित्याचे जगणे भगवंतांच्याच हातात आहे. आपण सर्व खरे तर त्या कृपाळू भगवंतांच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्याच आहोत. भगवंत आपले कधीच अहित करीत नाहीत यावर आपली श्रद्धा हवी. प्रत्येक साधक भक्ताने श्रद्धेय मनाने भगवंतांची निष्काम भावनेने फक्त उपासना करावी.
वामनराव देशपांडे