- राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, बीड
महाराष्ट्रातील संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेत आहेत. शिवाय वेदभाषा ही बहुजन समाज कळणारी नाही. त्या काळात वेदमंत्राचा अधिकार देखील सर्वांना नव्हता. त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला. संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उध्दाराचे हे तत्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदाच्या कृपणतेबद्दल संतांनी खंत व्यक्त केली.ज्ञानराज माऊली म्हणतात -
वेद संपन्न होय ठाई । परी कृपणू आण नाही ॥जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥
वेदातला उध्दाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून संतांनी वेद वांग्मय मराठी मायबोलीत आणले. वेदाचे काठिण्य लक्षात घेऊन भगवंताने श्रीकृष्ण अवतारात गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीता देखील कळाली नाही परत भगवंताने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला व वेदप्रणित मानवता धर्म तत्वज्ञान बहुजन समाजासाठी खुले केले.माऊली म्हणतात -
तैसा वाग्विलासे विस्तारु । गीतार्थेसी विश्व भरु ॥आनंदाचे आवारु । मांडू जगा ॥
संतांनी कर्मकांडात आणि व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देव प्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चातापपूर्वक भगवंताला शरण गेले की तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली. माऊली हरिपाठात वर्णन करतात -
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥
संताच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरा पगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला. पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे, त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त व संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा. जे जे कर्म कराल ते निष्काम व निर्लेप करा. कुणाचा कधी द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामि आहे, सर्वत्र आहे.
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥
ही भक्ती जनंमनात रूजविली अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर परमेश्वराचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्य दर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे.
अध्यात्मशास्त्रात विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्त्व आहे. खरं तर, माणसाचे मन एक कुरूक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार जास्त प्रमाणात उचल खातात व माणसाचा पशू होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
रुणु झुणू रुणु झुणू रे भ्रमरा । सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ॥
कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा कांही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत. लोखंडाची वस्तू खूप गंजलेली असेल तर लोह चुंबक तिला आकर्षित करू शकत नाही. वरचा गंज खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते. ही विकार विवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे. एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे. पेरणीचा विसर पडावा. शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापावे तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..? याचे कारण माणसात बळावलेली विकार विवशता हेच आहे. गोकुळातील एक गोपीका भगवंताला आतूरतेने हाक मारीत असे. देवा... एकदा माझ्या ह्रदय मंदिरात ये ना..? तुला बघावयाला मी खूप आतूर आहे. देव तिला रोज येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एक दिवस ती गोपबाला म्हणाली, देवा तुझे न येण्याचे कारण तरी सांग..? देव म्हणाले, तुझे ह्रदय मंदिर स्वच्छ कर मगच मी येईल. ती गोपीका आपला स्वानुभव कथन करते...
हरी या हो चला मंदिरी । कोणी नाही दुसरे घरी ॥काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥
देव हा माणसापासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटंत असेल तर हे विकार निर्मूलन झालेच पाहिजे. फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणात परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!ही विकार विवशता कमी करण्यासाठी संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे. फक्त विकार विवशते मुळे त्याची जाणीव होत नाही.
( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. भ्रमणभाष - 8329878467 )