- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
धर्म आणि विज्ञान यांचा तौलनिक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विज्ञान ही एक विचार पद्धती आहे. निरीक्षण, प्रयोग, प्रचिती आणि सिद्धता या प्रक्रि यांच्या सहाय्याने निसर्ग सत्याचा घेतला जाणारा शोध म्हणजे विज्ञान. धर्माची तीन अंगे आहेत, कर्म, ज्ञान, आणि उपासना. सत्य, प्रेम, त्याग, आणि श्रद्धा हे धर्माचे चार पाय आहेत. पहिले तीन पाय आज दुर्बल झाले आहेत. चौथा पाय श्रद्धेचा तो देखील देवळा पुरताच मर्यादित राहिला आहे. धर्म म्हणजे आचार, धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे शील, धर्म म्हणजे मर्यादा. जीवनात निंद्य काय आणि वंद्य काय हे धर्म सांगतो. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ ,आणि सर्वाहून परमात्मा श्रेष्ठ हे धर्माचे सार आहे.
विज्ञान आणि धर्म दोन्हीही आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे. विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे. विज्ञान हे सृष्टीचे ज्ञान असते, धर्म हे अंतरंगाचे भान असते. विज्ञान हे प्रयोग शरण आहे. धर्म हा तत्व शरण आहे. विज्ञान हे वैभवाचे प्रदर्शन आहे. धर्म हा जीवनाचे दर्शन आहे. धर्म हे आपले रूप असेल तर विज्ञान त्या वरचे वस्त्र आहे. सुखाने कसे जगावे हे विज्ञान सांगत असले तरी जगावे कशासाठी हे धर्मच सांगतो. धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो. स्वामी रामतीर्थ हे एकदा लाहोरच्या बाजारपेठेतून जात होते. रस्त्याच्या कडेला माडीवर एक लावण्यवती गणिका उभी होती. स्वामी तिच्याकडे एक टक बघतच बसले. बरोबर असणाऱ्या शिष्यांना वाटले, स्वामी तिचे सौंदर्य बघून मोहित झाले. गणिका देखील आश्चर्य चकित झाली. हा संन्यासी माझ्या रुपाने वेडा झाला की काय..? ती म्हणाली, स्वामीजी..
हुस्न को जो बदनजर देखते है ! वो पहले अपना सर कलम देखते है !
तिचे शब्द ऐकून रामतीर्थांची समाधी भंग पावली. स्वामी त्या गणिकेला म्हणाले, मैया...! ना तेरे रुप से गरज, ना तुझसे गरज!हम तो हमारे मुसोहर की कलम देखते है...! तू इतकी सुंदर तर तुला बनवणारा ईश्वर किती सुंदर असेल. हेच मी समाधी अवस्थेत बघितले. दृष्टीचा विकास हेच धर्माचे उद्दीष्ट आहे.वर्तमान काळात भोगवाद प्रचंड बळावत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भोगवादाच्या तळाशी वासनेचा ज्वालामुखी सतत धुमसत असतो. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होईल व या देशाची सभ्यता व संस्कृती नष्ट होईल. हा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची नितांत गरज आहे.
( लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्र. 9421344960 )