रमेश सप्रे
‘साधूसंत (सद्गुरु) येती घरा। तोचि दिवाळी दसरा’ हा सगळ्यांचा अनुभव असतो. पुराणात सुद्धा नारद, सनत्-सनक्-सनंदन-सनातन हे ब्रह्मकुमार, ऋषी-मुनी इत्यादी मंडळीचं आगमन झाल्यावर सर्वांना आनंद होत असे. प्रत्यक्ष देव-दानव-मानव याचे राजे सुद्धा उठून उभे राहून त्यांना अभिवादन करीत. त्यांना उच्चासन देत असत. कारण अशी तपस्वी, नि:स्पृह (कोणतीही इच्छा, अपेक्षा नसलेली) मंडळी आपल्याकडे येणं हा शुभशकून समजला जाई.
नंतरच्या काळात या ऋषीमुनींची जागा साधुसंत नि सद्गुरु यांनी घेतली. एकदा एका श्रीमंत शेटजीच्या घरी त्यांच्या सद्गुरुंचं आगमन झालं. घरातील सर्व मंडळींनी गुरुदेवांकडून दीक्षा घेतली होती. सर्वांना आनंदानं आकाश ठेंगणं वाटू लागलं. ‘यावे, यावे गुरुदेवा! म्हणून साऱ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार केला.
गुरुदेवांचा आवाज घनगंभीर होता. आकाशवाणीसारखा! ते म्हणाले, ‘वत्सा, मी फक्त एकच रात्र तुझ्याकडे राहायला आलोय. उद्या मी पुढच्या प्रवासाला निघेन. यावेळी मी एकटाच आलोय. सारे शिष्य आश्रमात आहेत. शेटजींनी आपल्या मित्रमंडळींना-सगेसोयऱ्यांना घाईघाईत बोलावून गुरुदेवांचा सत्संग आयोजित केला. घरात, घराबाहेर रोषणाई केली. खरंच दिवाळीसारखा आनंदाचा अनुभव सर्वांना येत होता. सत्संगानंतर सर्वांना महाप्रसाद झाला. सारे आपापल्या घरी गेले.
गुरुदेवांसाठी स्वतंत्र कक्ष सज्ज करून ठेवला होता. चांदीच्या ताटातून त्यांनी प्रसाद ग्रहण केला. वाट्या,भांडं, तांब्या (लोटा) सारं चांदीचं होतं. आपल्या व्रतानुसार गुरुदेवांनी सारी भांडी स्वत: धुतली नि खोलीतच वाळत घातली. घरातील साºया मंडळींची अगदी नोकर चारकरांचीही गुरुदेवांनी आस्थेनं चौकशी केली. इतक्या दिवसांनी आपल्यावर सुद्धा पू. गुरुदेवांना सर्वांची नावं, कौटुंबिक परिस्थिती स्मरणात कशी याचं सर्वांना नवल वाटलं नि सारे त्यांच्या चरणी लीन झाले. थोड्याशा आशीर्वचनानंतर सारे झोपायला गेले.
का कुणास ठाऊक पण एरवी पडल्या पडल्या योगनिद्रेत लीन होणारे गुरुदेव त्या रात्री अस्वस्थ झाले. सारखे कुशी बदलत होते; पण झोप येण्याची चिन्हं नव्हती. चित्रविचित्र विचाराचं वादळ त्यांच्या मनात घोंगावत होतं. शेवटी पहाट होण्यापूर्वी ते उठले. दिव्याच्या प्रकाशात त्यांना आदले रात्री वाळत घातलेली चांदीची भांडी दिसली. घरातलं कुणीही उठलं नव्हतं. ती भांडी चोरण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांनी सारी भांडी आपल्या झोळीत घातली. हळूच दार उघडलं नि झपझप पावलं टाकत ते दूर निघून गेले. इकडे शेटजी उठून पाहतात तो गुरुदेव नाहीत. आश्चर्य वाटून त्यांनी पत्नीला उठवलं. तिनं सर्वत्र शोध घेतल्यावर चांदीची भांडीही गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. सर्वांना आश्चर्य वाटलं. शोधाशोध सुरूझाली. भांडी गेल्याचं दु:ख नव्हतं; पण गुरुदेव न कळवता का गेले? भांडी त्यांनी नेली की दुसºया कुणीतरी? गुरुदेवांच्या जीवाला धोका नाही ना? अशा प्रश्नांनी शेटजी व इतर मंडळींना काळजी वाटू लागली. शेटजींनी खूप शोध घेऊनही गुरुदेवांचा पत्ता काही लागला नाही. दुसºया दिवशी सारे भोजनासाठी बसलेले असताना अचानक गुरुदेव आले. शेटजींनी सर्व मंडळींनी चरणवंदन करून त्यांना प्रसाद घेण्याचा आग्रह केला, त्याला नम्रपणे नकार देत गुरुदेवांनी झोळीतून चांदीची सारी भांडी काढून देवासमोर ठेवली व क्षमायाचना केली.
गुरुदेव सर्वांना विशेषत: शेटजींना उद्देशून म्हणाले, ‘काल ही भांडी मी अक्षरश: चोरून येथून पळून गेलो होतो. काल दिवसभर विचार करत होतो की आपल्याकडून अशी चोशी कशी घडली? अखेर उत्तर मिळालं की रात्री केलेल्या भोजनाचा तो परिणाम होता. जे अन्न माझ्या पोटात गेलं त्याला चोरीची वासना चिकटलेली होती. ज्यावेळी त्या अन्नाचा प्रभाव पूर्णपणे माझ्या तनामनातून निघून गेला तेव्हा माझा अपराध माझ्या लक्षात आला. खूप वाईट वाटलं. पश्चाताप झाला. देवाची मनोमन क्षमा मागितली नि सरळ इकडे आलो. मला प्रायश्चित्त करायचंय.
यावर शेटजी म्हणाले, ‘क्षमा मी मागायला हवी, गुरुदेव. कारण ज्या पैशानं मी तुमचा आदर सत्कार केला. तुम्हाला भोजन दिलं तो पैसा प्रामाणिकपणे मिळवलेला नव्हता. लोकांना फसवून मिळवलेली ही संपत्ती आहे. ही माझी चोरी अन्नावाटे तुमच्या शरीरातच नव्हे तर मनातही शिरली. यामुळे माझे डोळे उघडले. मला पश्चाताप होतोय. मार्ग दाखवा.’ आपल्या शिष्यानं अशी क्षमा मागितल्यावर प्रसन्न होऊन गुरुदेवांनी त्याच्या मस्तकावर हात ठेऊन आशीर्वाद दिला. ‘यापुढे पापानं पैसा मिळवू नकोस, परमेश्वर तुला भरपूर देईल. सध्याच्या संपत्तीतला बराचसा भाग योग्य पद्धतीनं दान कर आणि सर्वजण आनंदात राहा.’ सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. गुरुदेव पुढच्या प्रवासाला निघून गेले; पण मागे एक संदेश ठेवून गेले.
आपल्या भल्याबुऱ्या कल्पनांचा, विचारांचा, वासनांचा, कृतींचा परिणाम आपल्यावर बुद्धी विचारांवर होत असतो. यात अन्नाचाही समावेश असतो. म्हणून आनंद राहण्यासाठी योग्य वृत्तीनं मिळवलेला आहार उपकारक असतो. आहार हा आनंदाचं मुक्तद्वारच असतो.