पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।पासी त्वचेचिया पदराआड ।परीते अव्हेरून गोचिड ।अशुद्धचि सेवी ।।
समाजात भिन्न प्रवृत्ती वावरत असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींनी याचे मार्मिक वर्णन वरील ओवीत केले आहे. सकाळी सकाळी दूधवाला दूध घ्या म्हणून घरोघरी फिरतो. भाजी-फळे रसयुक्त पदार्थ घेऊन रस्त्यावरून फिरावे लागते. तेव्हा कुठे त्यास काही जण स्वीकारतात. परंतु आपण नीरा-मदिरा या वस्तू रस्त्यावरून ओरडून विकताना पाहिल्या आहेत का?
समाजमनात वाईट बाबींचा शिरकाव लवकर होतो व ते अनुकरण केले जाते. तथापि चांगल्या गोष्टी झिडकाराव्या लागतात. माणूस संगतीत राहतो. त्या गोष्टी स्वीकारतो, पण त्याचे मन वाईट व अव्हेरीत बाबींकडे लवकर आकर्षित होते. संत ज्ञानेश्वरांनी वरील ओवीत अत्यंत मार्मिक पद्धतीने तेच समाजास सांगण्याचा व उद्बोधित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माऊली म्हणतात, दूध हे पवित्र, गोड व पौष्टिक आहे. त्याच गाईच्या कासेजवळ गोचिडदेखील बसलेला असतो. दूध, त्वचा आणि रक्त या सर्व सिद्ध व निषिद्ध दोन्ही गोष्टी अगदी जवळ असतात. परंतु मधूर, अमृत असे दूध सोडून मानवाच्या विकृत प्रवृत्तीप्रमाणे गोचिड हे रक्ताचे सेवन करण्यास धन्यता मानते. मानवी मनाचे असेच काही घडते. त्यास योग्य सहवासाची व मार्गदर्शनाची गरज असते. संत माऊलींनी अशाच प्रकारचे वर्णन दुसऱ्या ओवीतही केले आहे. त्यात ते म्हणतात,
कां कमलकंदा आणि दर्दूरी ।नांदणूक एकेचि घरी ।परि परागु सेविजे भ्रमरी ।येरा चिखलचि उरे ।।
याचा अर्थ भ्रमर आणि बेडूक यांचे वास्तव कमळाच्या फुलाजवळ असते. परंतु भ्रमर हा गोड असे मधाचे सेवन करतो, तर बेडूक चिखलात रुतून राहतो. यावरून सहवास, वास्तव्य, विचार, परिवर्तन आणि ज्ञान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजाचे उद्बोधन होणे, चांगल्या-वाईट गोष्टींचा फरक स्पष्ट करणे हाच या स्वैर लिखाणाचा उद्देश आहे.
- डॉ. भा.ना. संगनवार