- सदगुरू श्री वामनराव पै
प्रत्येक गोष्टीत फसण्याचे कारण अज्ञान असते.
आपल्या जीवनात ज्या-ज्या वेळी आपली फसवणूक होते त्या-त्या वेळी त्या प्रत्येक गोष्टीत फसण्याचे कारण अज्ञान असते.डॉक्टर, वकिल, इंजिनियर या सर्वांकडे त्या-त्या विषयाचे ज्ञान असते व त्या ज्ञानाच्या बळावर ते लोकांचे काम ही करतात पण ते ज्ञान जर अर्धवट असेल तर माणसे सुखी होण्याऐवजी दु:खी होतील.पुष्कळदा डॉक्टर चुकीचे औषध देतात व रोगी मरतो.आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ असे आपण म्हणतो पण आत्मज्ञान झाले म्हणजे माणूस सुखी होईल असेही नाही.आत्मज्ञान आहे पण व्यवहारिक ज्ञान नाही तर माणूस दु:खी होण्याची शक्यता जास्त असते.अशी माणसे मला माहित आहेत म्हणून मी हे सांगतो.अध्यात्मात त्यांची प्रगती झालेली होती पण व्यवहारिक ज्ञान नसल्यामुळे ते फसले.मी नेहमी सांगतो अध्यात्म,अध्यात्म किंवा फक्त देव,देव करत बसू नका.देव हा एक घटक आहे व तो अतिशय महत्वाचा आहे पण दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पैसा.पैशांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.पुष्कळ लोक असे म्हणतात की आम्ही परमार्थात पडलो.परमार्थात पडलो की आमची सर्व जबाबदारी त्या बुवावर किंवा त्या बाबावर पडते.मी सांगतो तो बाबा जेवला तर तुझे पोट भरणार आहे का? तुझे पोट भरायचे असेल तर तुलाच जेवले पाहिजे आणि तुला जेवले पाहिजे तर तू काम केले पाहिजेस,कष्ट केले पाहिजेस नाहीतर शेवटी भीक मागितली पाहिजेस.कारण काम केले नाहीतर शेवटी भीक मागण्याची वेळ येते.“भिक्षापात्र अवलंबणे जडो जीणे लाजिरवाणे”.भीक मागण्यापेक्षा मेलेले बरे असे संतांनी म्हटलेले आहे.लोक आधीच अज्ञानी व त्यांचे अज्ञान वाढविणारे अनेक लोक आहेत.आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी त्यांची स्थिती होते.जी स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे तसे लोकांचे होते.लोकांना जर ज्ञानी केले तर ते लोक सुखी होतील पण तोडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची जी निती आहे ती आमच्या लोकांनी अवलंबिलेली आहे.हिंदु मुस्लिम एैक्य होणे कठीण आहे का? खरंतर हे सोपे आहे.अजिबात कठीण नाही पण आपल्याच लोकांची तशी इच्छा नाही.अनेकांना असे वाटते की हे जर एक झाले तर आम्हांला कोण विचारणार?यांच्यात भांडणे होवू लागली तर आपल्या पोळीवर तूप ओढून घ्यायला बरे.धर्ममार्तंड सुध्दा लोकांचे अज्ञान वाढविण्याचे काम करतात.दहशतवादी लोकांना सांगितले जाते की मेलास तर स्वर्गात जाशील व जगलास तर आमच्याकडून तुला खूप पैसा मिळेल.हे सगळे घडते ते अज्ञानामुळेच.अज्ञान हेच मानवजातीच्या सर्व समस्यांचे,दु:खाचे मूळ आहे यासाठी ज्ञान महत्वाचे आहे.