- सदगुरू श्रीवामनराव पै
माणूस ही जात व माणुसकी हाच धर्म
धर्म,वर्ण, प्रांत, राष्ट्र यामुळे मानवजातीची जी विभागणी झाली तिचे परिणाम पाहिले तर उपाय करायला जायचे व तोच अपाय व्हावा असे दिसून येते.सोय म्हणून जे केली ती गैरसोय झाली व ती गैरसोयच आपल्या मानगुटीवर बसलेली आहे.अखिल मानवजातीच्या दु:खाला हेच अज्ञान कारणीभूत आहे.आपल्याला जर कुणी विचारले तुमची जात कोणती तर माणूस ही जात.धर्म कोणता तर माणुसकी हाच धर्म.देव कोणता माझ्या ह्रदयात नांदणारा ईश्वर व जो सर्व भूतमात्रात नांदतो तो ईश्वर हाच खरा देव.अशा रितीने मानवी संस्कृतीचे संस्कार झाले तर जगात नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही.सांगायचा मुद्दा असा हे अज्ञान सर्व दु:खाचे मूळ आहे व या अज्ञानातून किती गोष्टी निर्माण होतात.अज्ञानातून अहंकार निर्माण होतो,अभिमान निर्माण होतो, असूया निर्माण होते,अंधश्रध्दा निर्माण होते,अविचार निर्माण होतो व अतिरेक निर्माण होतो.अज्ञानातून या सात गोष्टी निर्माण झाल्या.एका अज्ञानातून या इतक्या गोष्टी निर्माण होतात.अज्ञान हे एक आहे असे नव्हे तर या अज्ञानाची ही सर्व पिलावळ आहे व ती एकापेक्षा एक भयानक आहे.यापेक्षा राक्षस परवडले असे म्हणण्याची वेळ येते.जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मानवजात सुखी होणे शक्य नाही असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे.कितीही सुधारणा केल्या तरी काहीच उपयोग होत नाही.बघा तुम्ही आज धार्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक किती सुधारणा केल्या तरी परिस्थिती अधिकच बिघडत आहे,कधीकधी त्यामुळे पूर्वीचे बरे होते असे देखील म्हणण्याची वेळ येते.ब्रिटीशांच्या काळात आनंदी आनंद होता असे म्हणणारे लोक आहेत.त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे.जरी तो काळ पारतंत्र्याचा होता तरी लोक सुखी होते.लोकांना बाहेर पडताना भिती वाटत नव्हती.गोव्यात पोर्तुगीजांनी पाचशे वर्षे राज्य केले पण तिथेही लोक सुखी होते. त्यावेळी चो-या होत नव्हत्या,खून होत नव्हते.मी पूर्वी बायकोच्या घरी गोव्याला जायचो तेव्हा तिथले लोक आपल्या घराला कुलूप लावत नसत.पण आज बघा अगदी अलिकडे गोव्यात किती खून पडले.हिंदुस्थानातही आज बजबजपुरी माजलेली आहे.कुठल्याही प्रकारची स्थिरता नाही, सर्वत्र अशांतता आहे, कुठलीही सुरक्षितता नाही याला प्रगती म्हणायची का? याला प्रगती म्हणता येणार नाही.याला कोण जबाबदार आहे तर याला आपण सर्वच जबाबदार आहोत.माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालत रहाणार.सुख कमी व दु:ख जास्त हे जे चाललेले आहे हे असेच चालत रहाणार जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलत नाही म्हणून माणसाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये माणसांची मानसिकता बदलतो.त्यांना आम्ही ज्ञान देतो व हे ज्ञान वेगवेगळया प्रकारचे असते.