- सदगुरू श्री वामनराव पै
जीवन जगणे ही कला, शास्त्र व विद्या आहे.
आपण जीवन प्रवासाला निघालेले आहोत व आपली गाडी चुकलेली आहे.आज आपण मी हिंद,ू मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी बौध्द या गाडीत बसलेले आहोत.गाडी कुठली पाहिज तर मी माणूस.मी माणूस ही गाडी अचूक बरोबर मग त्या गाडीत बस. मी माणूस या गाडीत बसलास की तू हिंदूचा द्वेष करणार नाहीस, मुस्लिमांचा द्वेष करणार नाहीस, ख्रिश्चनांचा द्वेष करणार नाहीस कारण ही सर्व माणसे आहेत हे तुझ्या लक्षात येईल.मी माणूस आहे व मी माणसासारखे वागले पाहिजे.माणसासारखे वागणे हयालाच खरा धर्म म्हणतात.जगातील सर्व माणसे याप्रमाणे वागू लागली तर जगात सुखच सुख होईल.जगातील माणसे त्याप्रमाणे वागतील तेव्हा वागतील पण आपण आपल्यापासून तरी सुरवात करूया.आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये येणा-या माणसाची आधी ही मानसिकता बदलतो.आम्ही काय करतो? त्यांची गाडी जी चुकलेली आहे ती रुळावर आणतो.बाकी आम्ही काही करत नाही.उदी भस्म देत नाही.अंगारेधुपारे देत नाही.खडे अंगठया देत नाही.उभेआडवे गंध लावायला सांगत नाही.तीर्थयात्रा करायला सांगत नाही.ग्रंथाची पारायणे करायला सांगत नाही.पुस्तकांचे वाचन करायला सांगतो पण पारायणे करायला सांगत नाही.पारायण का करायला सांगत नाही.ते वाईट आहे असे नाही पण हे करून तुम्हांला जे ज्ञान मिळायला पाहिजे ते मिळत नाही.जीवन जगणे ही एक कला आहे, ते एक शास्त्र आहे, ती एक विद्या आहे,ही कला प्रथम समजून घे.आज आम्ही जीवनाचा प्रवास करायला निघतो पण आपली गाडी चुकते,डबा चुकतो, वेळ चुकत,े स्टेशन चुकते आणि आपण दु:खाच्या खाईत लोटले जातो.आपली गाडी कुठली?मी माणूस आहे.मी माणूस आहे व माझ्या आजूबाजूला सर्व माणसे आहेत.आपण सर्व देवाची लेकरे आहोत असे म्हटले की विश्वबंधुत्व आले.हिंदू धर्मात काय शिकविले जाते?हिंदू धर्मात हेच शिकविले जाते की आपण सर्व देवाची लेकरे आहोत.हिंदू धर्माने तर फक्त माणूस नव्हे तर सर्व भूतमात्रांचा विचार केलेला आहे.इथे बंधुत्व आलेच पण धर्मातले लोक त्याप्रमाणे वागत नाहीत याला कोण काय करणार? धर्म सांगतो, दारू प्यायची नाही हा दारू पितो.धर्म सांगतो, खून करायचा नाही तरी हा खून करतो.धर्म सांगतो, माणसासारखा वाग तरी हा राक्षसासारखा वागतो आता याला कोण काय करणार?धर्माने सांगितले एक व आणि हा करतो दुसरेच.याला धर्म काय करणार सांगा.