- सदगुरू श्री वामनराव पै
देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे
आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो. त्यात ज्योतिषी जे काही सांगतात व ते ही त्यांना पटते.मी नापास होणार आहे असे ज्योतिष्याने सांगितले तर मग मी अभ्यास कशाला करू किंवा ज्योतिषाने सांगितले मी पास होणार तरी मी अभ्यास केला नाही तरी चालेल असे मुलांना वाटते.मुळात मुलांना अभ्यासच करायचा नसतो व त्यामुळे ते ज्योतिषी काय सांगतात असे वागतात. थोडक्यात देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे असे सांगितले तर ते लोकांना पटत नाही.लोक आम्हाला सांगतात वामनराव तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण जरी ते खरे असले तरी मनाला पटत नाही असे का? त्यावर मी नेहमी सांगतो नाहीच पटणार कारण इथे प्रयत्नवाद सांगितलेला आहे. आणि प्रयत्नवाद कुणाला हवा असतो.मनाची प्रवृत्ती ही नेहमी खालच्या दिशेने वहात असते त्यामुळे लोकांना नेहमी दैववाद पटतो, प्रयत्नवाद पटत नाही.मानवी जीवनांत दु:ख का? खंरतर याचे एकमेव कारण लोक दैववादी आहेत हे आहे.आयुष्यात ९० टक्के घटना आपल्या हातात असतात तर १० टक्के घटना या पराधीन असतात.पण लोकांचा असा समज असतो की सर्व काही दैवाधीन आहे,सर्व काही पराधीन आहे. आणि असे मोठमोठया लोकांनी सांगितल्यामुळे लोकांना तेच खरे वाटत असते.पण ते त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने किंवा कोणत्या संदर्भात सांगितले आहे याचा कोणीच विचार करीत नाही.आयुष्यातील ९० टक्के घटना आपल्या हातात आहेत म्हणूनच आम्ही सांगतो “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” माणूस दु:खी होण्याची अनेक कारणे आहेत.पण याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान.अज्ञान हेच सर्वांच्या दु:खाचे मूळ आहे.जगातील सर्व समस्यांचे, दु:खाचे मूळ हे अज्ञान आहे.हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणे कठीण आहे.जीवनात बघा ज्या ज्या ठिकाणी ज्ञान असते त्या ठिकाणी सुख असते व ज्या ज्या ठिकाणी अज्ञान असते त्या ठिकाणी दु:ख असते.जीवनांत अज्ञान हे वेगवेगळया प्रकारचे असते.परमार्थात, प्रपंचात, धंद्यात अज्ञान असेल तर माणसाच्या वाटयाला दु:ख येते.कारण त्या गोष्टींबद्दल ज्ञान करून घेतले की सुख मिळते.संसार दु:खाचा होतो कारण अज्ञान.संसारात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात.बायका स्वयंपाक करतात जर त्यांना स्वयंपाकाबद्दल ज्ञान नसेल तर त्यांना तो करता येणार नाही.कारण त्यासाठी स्वयंपाकाचे ज्ञान हे फार महत्वाचे आहे.जीवनविद्येने संसारात चूल व मूल या दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे.इतरांनी चूल व मूल या गोष्टींना गौण स्थान दिलेले आहे.आज जगात ज्या समस्या आहेत त्याचे मूळ कारण म्हणजे चूल व मूल या गोष्टींना दिलेले गौण स्थान हे होय.