- सदगुरू श्री वामनराव पैपुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे दु:खी होणे सोपे व सुखी होणे कठीण.असे असताना सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे आम्ही सांगतो हयाचे कारण असे की, आपण जीवन जगत असताना ज्या त-हेने जीवन जगले पाहिजे त्या त-हेने आपण जीवन जगत नाही.आपल्या मनात काही विचित्र कल्पना असतात भावना असतात.तसेच काही धारणा झालेल्या असतात व संकल्पना झालेल्या असतात.पूर्वजन्मीच्या हया सर्व गोष्टी घेऊनच आपण या जन्माला आलेले असतो. आत्ताच्या आपल्या जन्मानंतर आपल्यावर विविध संस्कार होतात.हे संस्कार आपल्या पूर्वीच्या संस्कारांना सिमेंट काँक्रिट करतात व मरताना पून्हा आपण हे संस्कारच घेऊन पुढील जन्मामध्ये जातो| पुन्हा जन्माला येतो तेव्हा पुन्हा तेच.म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,“किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित” हयातून सुटका करून घ्यायची असेल तर आधी माणूस सुखी का होतो? व माणूस दु:खी का होतो? हे समजून घेतले पाहिजे तसेच मनुष्य सुखी केव्हा होतो व दु:खी केव्हा होतो हे देखील समजून घेतले पाहिजे.या सर्वातून एक गोष्ट आपल्या लक्षांत येईल की पुष्कळ क्षणी माणूस कारण नसताना दु:खी होतो. खरंतर कारण काहीच नसते तरी देखील आपण दु:खी होत असतो.घरात सर्व रेलचेल असते.घरात काहीही कमी नसते.श्रीमंती ओतप्रोत भरलेली असते.घरातले कपाट अक्षरश: नोटांनी भरलेले असते.पण तरिही माणूस दु:खी असतो.एका माजी मंत्र्याच्या घरात नोटांनी भरलेल्या गोणी सापडल्या.सांगण्याचा उद्दीष्ट हा की असे सगळं असताना सुध्दा म्हणजे श्रीमंती आहे, मुलेबाळे आहेत,सुनाजावई आहेत तरी माणसे दु:खी असतात.ज्याच्याकडे काही नाही तो जर दु:खी झाला तर एकवेळ आपण समजू शकतो.ज्याला रहायला घर नाही किंवा ज्याला खायला देखील मिळत नाही,ज्याला अगदी प्यायलाही मिळत नाही.आता इथे प्यायला म्हणजे पाणी मिळत नाही हे लक्षात घ्या नाहीतर बाकीचे पिणे कुठेही सहज मिळते.देव सर्वव्यापी आहे असे म्हणतात तसं दारू सर्वव्यापी असे म्हटलं पाहिजे.मला माहित नाही पण लोक असं म्हणतात की,”कुठेही जा दारू तुम्हांला कुठेही सहज मिळेल म्हणजे अगदी जिथे दारूबंदी आहे तिथेसुध्दा दारू मिळू शकते.या जगात आज दारू पिणारे लोक 99 टक्के आहेत व जे लोक दारू पित नाहीत त्यांना हे लोक हसतात, त्यांची निंदा करतात,कुचेष्टा करतात.दारूचे इतके महात्म्य वाढलेले आहे हे आश्चर्य करण्यासारखे आहे.गडकयांच्या एकच प्याला नाटकात तो तळीराम काय म्हणतो की ,मी एक मंडळ स्थापन केलेले आहे व आमच्या मंडळाचे ध्येय काय तर जगांत दारू सर्वत्र पोहचावी.गडकरी हे विनोदी नाटककार होते.त्यांनी जी नाटके लिहिली ती वाचली किंवा पाहिली तर अशी नाटके पुन्हा होणे नाही असे वाटते.त्यांनी लिहीलेले संवाद मोठे असायचे ते आताच्या लोकांना पाठही होणार नाहीत.पण असा माणूस देखील असे लिहून ठेवतो.
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 4:01 PM