- सदगुरू श्रीवामनराव पै
जन्मापासूनच प्रवास सुरू आहे.
जीवनविद्या मिशनमध्ये येणा-यांना जीवन जगणे ही कला आहे हे आम्ही सर्वात आधी शिकवितो.आणि हे आता शिकवितो असे नाही तर गेले कित्येक वर्षे हे आम्ही लोकांना शिकवित आहोत.मी नेहमी सांगतो जीवन जगणे ही कला आहे हे तू आधी शिकून घे.कारण जीवन जगणे ही कला आहे हे आज कुणीच सांगत नाही. ना आईवडिल, ना शिक्षक, ना प्रोफेसर, ना धर्ममार्तंड, ना राजकारणी कुणीच असे सांगत नाही.हे फक्त जीवनविद्या मिशनच सांगते.जीवन जगणे ही कला आहे व या कलेत फक्त ध्यान लावणे एवढीच गोष्ट शिकवली जात नाही.लोकांना वाटते की ध्यान लावले, मेडिटेशन केले, डोळे मिटून बसले किंवा मौन धारण केले की जीवनातले सगळे प्रश्न सुटतील.याने तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा.जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी ज्ञानच पाहिजे.हे ज्ञान कसले तर हे ज्ञान व्यवहारिक, पुस्तकी, आत्मज्ञान असे सर्व प्रकारचे ज्ञान पाहिजे.ज्ञान म्हणजे माहिती इतके ते मर्यादित नसू नये.ज्ञान म्हणजे माहिती व ती सर्वांना मिळालीच पाहिजे कारण ही माहिती जितकी अधिक तितके त्याचे जीवन सुसह्य होते.माहितीज्ञान नसेल तर त्या माणसाला परिस्थितीकडून मार मिळण्याची शक्यता अधिक जास्त असते.उदाहरण द्यायचे झाले तर एखादयाला दिल्लीला जायचे असेल व कुठल्या गाडीत बसायची ही जर माहिती त्याला नसेल तर त्याची जी वाट लागते.असे खरंतर आपले झालेले आहे.आपण प्रवासाला निघालेले आहोत व अज्ञानाच्या गाडीत बसलेले आहोत.कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे, कधी पोहचायचे आहे याचे काहीच ज्ञान नाही आणि आम्ही प्रवास करतो आहोत.लोक म्हणतात एकेक दिवस ढकलतो आहे. कोणाला जर विचारले की काय गोविंदराव कसे चाललेले आहे?यावर ते काय सांगतात काय सांगू वामनराव एकेक दिवस ढकलतो आहोत.दुसरे रामराव त्यांना विचारले कसे काय रामराव?तर ते म्हणतात मरत नाही म्हणून जगतो आहोत.याला काय जीवन म्हणतात का? आपण जर नीट विचार केला तर माणूस जन्माला येतो तिथून त्याचा प्रवास सुरू होतो.पुर्नजन्म जर मानला तर असा अनेक जन्मापासून प्रवास सुरू आहे.किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असे म्हटले जाते.पुर्नजन्म जावू दे आपण सध्याच्या जन्माचा विचार केला तरी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा प्रवास सुरू असतो.हा प्रवास मी कशासाठी करायचा आहे? मी जन्माला आलोच का? मला जन्माला घातले ते का घातले? इथे परमेश्वराचा संबंध काय?जर त्याने आम्हांला जन्माला घातले तर तो आमची बाकीची सोय का करत नाही ? असे परमेश्ववराला दोष देणारे अनेक लोक आहेत.