- सद््गुरू जग्गी वासुदेवसक्तीने किंवा धाक दाखवून कोणतीही शिकवण लादता येत नाही. काही काळ सक्तीने थोड्याफार गोष्टी तुम्ही लोकांना करायला भाग पाडू शकता. पण ही सक्ती जर दीर्घकाळ असेल तर तुमच्या आणि त्यांच्या, दोघांच्याही जीवनावर त्याचा परिणाम होतो. सक्तीने कोणतीही कृती सातत्याने लादण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचे आयुष्य बेसूर होते. त्याचवेळी त्या सक्तीपासून दूर जाण्यात जीवन बेताल होते़ वस्तुत: शिस्त आणि काहीही शिकणे हे दोन्ही शब्द एकसमान आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की ‘मी शिस्तप्रिय आहे’ याचा अर्थ तुम्ही नेहमी शिकण्यासाठी तयार आहात. तुम्ही कुठल्याही साच्यात बंदिस्त झालेले नाहीत. तुम्ही शिस्त पाळता म्हणजे तुम्ही सातत्याने काही नवे शिकण्याचा प्रयत्न करता. त्यासाठी तयार असता. उत्सुक असता. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की एखादी गोष्ट दररोज साचेबद्धपणे विशिष्ट प्रकारे करणे म्हणजे शिस्त नव्हे. उलट प्रत्येक गोष्ट उत्तमरीत्या करायला शिकण्यासाठी राजी असणे आणि त्या दिशेने सतत प्रयत्नशील असणे म्हणजे तुम्ही शिस्तीचे आहात. या शिस्तीत कोणतीही नवी गोष्ट शिकण्याकडे कटाक्ष असतो. त्यातून तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालत असता. म्हणूनच लहान मुलांच्या जीवनात जर योगसाधना आणली, तर ती आपोआप शिस्तप्रिय होतील. कारण योगसाधनेत काही विशिष्ट गोष्टी अत्यंत दक्षतेने कराव्या लागतात. त्यात सातत्य ठेवावे लागते. अचूकतेचा आग्रह धरावा लागतो. त्याशिवाय योगाचे परिणाम दिसून येत नाहीत. ज्या दक्षतेने योगाचे प्रशिक्षण दिले जाते ते पाहता तुम्ही शिस्तीपासून दूर जाऊ शकत नाही आणि एकदा का योगसाधना त्याच दक्षतेने केली, की तुम्ही बेशिस्त असणे अशक्य आहे. त्यामुळे योगसाधनेतून तुम्ही एकाच वेळी शिस्तप्रियही होता आणि सदोदित काही नवे शिकण्यासाठी प्रफुल्लित असता. नवे शिकण्यास उद्युक्त होता, हेच त्याचे यश आहे.
शिक्षण आणि शिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 4:01 AM