- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)
आज एकविसाव्या शतकांत माणसाने नेत्रदीपक प्रगती केली. प्रत्येक गोष्टींत त्याने निसर्गाशी स्पर्धा मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या बुद्धीच्या बळावर त्याने आकाशाला गवसणी घातली. हे सगळं करीत असताना गती आणि प्रगती मिळाली पण त्यामागे धावताना निखळ शांती, आनंद तो हरवून बसला. आज सगळी सुखं माणसापुढे हात जोडून उभी आहेत पण एक अपूर्णता, रितेपण माणसाला ग्रासून आहे. या रितेपणातून परिपूर्ण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्म म्हणजे देवधर्म, पूजाअर्चा एवढा संकुचित अर्थ घेऊन उपयोग नाही. अध्यात्म म्हणजे निरागस आनंद, निखळ शांती पण या अध्यात्माकडे जाण्यासाठी काही गुण लागतात. ज्याप्रमाणे नोकरीसाठी पात्रता (Eligibility) आणि अर्हता (Qualification) बघितली जाते त्याप्रमाणे अध्यात्मासाठी देखील जीवनात विवेक आणि वैराग्य यांची नितांत गरज आहे. ज्ञानराज माऊली म्हणतात -
जे वैराग्याची शीव न देखती । विवेकाची भाषा नेणती ।ते कैसेनि पावती । मज ईश्वराते ॥
माणूस श्रीमंत आहे की गरीब, साक्षर आहे की निरक्षर आहे, कोणत्या धर्माचा, कोणत्या संप्रदायाचा आहे याला अध्यात्मात काहीच महत्त्व नाही. अध्यात्मात फक्त विवेक आणि वैराग्य यालाच महत्व आहे.
सकाळची वेळ होती. पतीला नोकरीवर जायचं होतं. घरांत छोटंसं मूल होतं. वेळेच्या आत डबा तयार झाला पाहिजे. मूल जागं होतं. आई त्याला एक खेळणं देते ते त्याच्याशी खेळत असतं. आई कामाला लागते. काही वेळात त्या खेळण्याला कंटाळून मूल रडू लागते. आई त्याला त्याहून चांगले आणखी एक खेळणं देते. त्या नवीन खेळण्यात ते मूल आणखी काही काळ रमते. आई काम उरकते. थोड्या वेळानं पुन्हा ते मूल रडू लागते, खेळणं फेकून देते. आई त्याचे आवडते खेळणे त्याला देते. ते पुन्हा खेळण्यात रमतं आणि त्याची आई कामात दंगते. शेवटी एक क्षण असा येतो की, त्या बाळाला कुठल्याही प्रकारची खेळणी नको असते तर फक्त आई हवी असते. ते मूल परत रडू लागते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई त्याच्या पाठीत एक धपाटा घालते पण ते मूल तरीही आईला अधिकच बिलगते आणि जणू ते आईला म्हणत असते -
" तार अथवा मार " आता मला तूच हवी आहेस. आता त्या मुलाला आईच हवी असते हा विवेक आणि कोणतीही खेळणी नको हे वैराग्य. थोडक्यात विवेक म्हणजे निवड आणि वैराग्य म्हणजे नावड.
जीवनातील अडीअडचणी, संकटं, दुःखाचे प्रसंग यामुळे बहुतांशी लोक व्यसनाधीन होतात पण व्यसनामुळे मनःशांती मिळते का.? मनःशांती तर मिळत नाहीच उलट मनाचे संतुलन बिघडण्याचा संभव असतो. म्हणून अशा वेळी ज्या ज्या ठिकाणी आपलं मन गुंततं उदा. संपत्ती, धन, बायकामुलं हे व्यर्थ आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
कैसे घर कैचा संसार । कासया करिसी जोजार ।जन्मवरी वाहोनि भार । सेखी सांडोनि जाशी ॥
कैची माता कैचा पिता । कैची बहीण कैचा भ्राता ।कैची सुह्रदे कैची वनिता । पुत्र कलत्रादिक ॥
हे तू जाण मावेचि । आवघि सोयरी सुखाची ।ही तुझ्या सुखदुःखाचि । सांगाती नव्हेचि ॥
जीवनात कर्म करावेच लागणार किंवा कर्म हे अनिवार्य आहे ते टाळता येत नाही पण दुःखाच्या प्रसंगातून जे अंतर्मुख होतात अशांना वैराग्य प्राप्त होते. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
जो त्रिविधतापे पोळला । संसारदुःखे दुखवला ।तोचि अधिकारी जाला । परमार्थ विषई ॥
म्हणजे आपण समजतो त्याप्रमाणे वैराग्य म्हणजे हेकाडपिसे नाही तर वैराग्यात आसक्तीचा त्याग नैसर्गिक आहे. त्या त्यागाबद्दल मनांत ओढाताण, धुसफूस, दुःख नसणे. ज्याप्रमाणे झाडावरील पिकलेलं पान आपोआप गळून पडतं त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीतलं व्यर्थत्व समजलं की, त्या वस्तूचं आकर्षण संपून जातं कुठलीही वेदना उरत नाही.
रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता आहे तिचा अर्थ असा -समुद्रकिनारी लहान लहान मुलं खेळत होती. प्रत्येकजण आपापलं घर बांधत होती. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागताच त्या मुलांना आपापल्या घरी जाण्याची आठवण झाली आणि आपणच बांधलेली वाळूची घरं तुडवित मुलं आपापल्या घरी निघून गेली. मुलांचं हे घर तुडवणं म्हणजे वैराग्य. इथं कुठलीही मानसिक ओढाताण नाही, सोडण्याची खंत नाही.
मूळ वैराग्य ही दुःखदायक संकल्पना नाही ती आनंददायी संकल्पना आहे. वस्तूचे हवे नको पण संपणे म्हणजे वैराग्य. आसक्तीही नाही आणि द्वेषही नाही अशी मानसिकता तयार झाली की, माणूस निखळ शांती, सुखाच्या मार्गाने नक्कीच जाऊ शकतो फक्त याठिकाणी माणसाने प्रामाणिकपणे आपला मार्ग निवडायचा आहे. गीता माऊली सांगते की, ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, भक्तीयोग या चार प्रकारांनी आपल्याला निखळ शांतीपर्यंत पोचता येते पण सर्वसामान्य माणसासाठी भक्तियोग सुलभ मार्ग आहे फक्त आपल्या 'मी' चे म्हणजे अहंकाराचे विसर्जन मात्र आपल्याला करायलाच हवे आणि असे 'मी' चे विसर्जन पायरीपायरीने किंवा क्रमाक्रमाने करण्याचा मार्ग अध्यात्मशास्त्राने सांगितला तो पुढील लेखांकात पाहूया...!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र.८७ ९३ ०३ ०३ ०३ )