- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले. सच्चिदानंदाच्या कंदातील ब्रह्मानंदाचा अशब्द अनुभव स्वत: चाखता-चाखता ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ या नम्र भावनेने आपल्या अनुभवाचे प्रकटीकरण जनता जनार्दनासमोर केले. हे सारे करीत असताना संतांनी प्रथम समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे कठीण कार्य केले अन् मगच त्यावर उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार केले. समता, ममता, मानवतावाद, विश्वबंधुत्व यांसारखी जीवनमूल्ये जर समाज जीवनात रुजायची झाली, तर वैराग्यसंपन्न वा अपरिग्रही सत्पुरुषांची समाजाला गरज आहे. वैयक्तिक पातळीवरील पारमार्थिक हित जर साध्य करायचे असेल, तरीही अपग्रह अथवा त्यागाची गरज आहे. अनुकूल सुखाच्या भोगांचा जाणीवपूर्वक त्याग करण्याच्या मनोवृत्तीला आध्यात्मिक परिभाषेत ‘वैराग्य’ म्हणून संबोधण्यात येते. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकारी होण्यासाठी विवेक, वैराग्य, भक्ती, शांती, दमन, बोधवृत्ती, ईश्वरप्रीती आदी सद्गुणांची कास धरावीच लागेल. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकाराची पायरी न चढताच, केवळ टिळे, टोपी, माळा यांची भाऊगर्दी वाढू लागली, तर या गर्दीस केवळ देवत्वाचाच नव्हे, तर साध्या मनुष्यत्वाचासुद्धा विसर पडतो. भोगलालसेने बरबटलेला दुसऱ्याच्या श्रमावर डोळा ठेवून श्रम न करताच गर्भश्रीमंत होणारा, ‘न बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या’ असे जीवन जगणाºयास अत्यंत पारमार्थिक विचारांचे शोधन तर सोडाच, साधे संसारातसुद्धा सन्मानाने जगता येत नाही. साधकाच्या साधन मार्गाच्या जीवनसूत्रीचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणाले होते,त्यागेवीण विरक्ति । प्रेमा वाचुनि भक्ति ।शांती नसता ज्ञाप्ती । शोभा न पवे ।दमने वाचुनि यति । मानावीण भूमिपती ।युगी नसता युक्ति । शोभा न पवे ।बहिर्मुख कविमती । नेमावाचुनि कृति ।बोधेवीण महंती । शोभा न पवें ।।जोपर्यंत निस्सीम भावाचा ज्ञानबोध फळाला येत नाही, तोपर्यंत महंतपदास कधीच शोभा येऊ शकत नाही. यासाठीच तर साधकास काही अनुकूल भोगाचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. कारण त्यागाशिवाय ज्ञानाला काडीचाही अर्थ शिल्लक राहत नाही. यासाठी गरज आहे ती वैराग्य भावनेची.
त्यागावाचून वैराग्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:19 AM