- वामनराव देशपांडे
पार्था, मानवी विश्वात शुद्ध ज्ञानासारखे अतिशय पवित्र दुसरे काहीही नाही, हे तू प्रथम जाणून घे. जे योगसिद्ध आहेत ते निष्काम कर्मयोगी सिद्ध पुरुष या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. पार्था, मानवी जीवालाच ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. हे ज्ञानप्राप्तीचे सामर्थ्य इतर कुठल्याही योनीत नाही. परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव फक्त माणसापाशीच आहे. म्हणून माणसाने इतर भोगयोनींप्रमाणे आपला मानवी जन्म भोगात रत होण्यात खर्च न करता, देहवृद्धी जागृत न करता, आत्मसाक्षीने जगण्याचा प्रयत्न करावा आणि निष्काम वृत्तीने आपले विहित कर्म प्राणपणाने पूर्ण करीत, परमेश्वर प्राप्तीसाठी दृढ चित्ताने उपासना करावी. पवित्र ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे आणखी दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादित करताना भगवंतांनी एक अत्यंत महत्त्वाचा तत्त्वविचार अधोरेखित केला की या ज्ञानप्राप्तीसाठी कोणा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरुषोत्तमाच्या ज्ञानसहवासात राहण्याची आवश्यकता नाही. कारण हे भगवंतांना अभिप्रेत असलेले ज्ञान, निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त करून घेणे, कुणाही साधक भक्ताला सहज शक्य आहे. ‘मी’पण एकदा का गळून पडले की, करीत असलेल्या कर्माचे कर्तेपण संपुष्टात येते. आपण कर्म करीत नसून, भगवंतच आपल्याला प्रेरणा देऊन हे कर्म आपल्याकडून करवून घेत आहे हा सद्भाव एकदा का शुद्धाचरणी अंत:करणात सतत स्फुरण पावत राहिला की मर्त्य मानवी जीवनातले कर्तेपण आणि फलाशा अक्षरश: भस्मिभू होऊन जाते. तोच तर शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीचा अपूर्व दिव्य क्षण असतो.