विजयराज बोधनकरआजकालच्या काचाबंद इंटरनॅशनल स्कूलचं जंगल वाढतच चाललंय. अनेक इंटरनॅशनल शाळांना, कॉलेजला खिडक्याच नसतात. संपूर्ण वातानुकूलित स्कूल असतात. मुलांच्या सुखासाठी सुखावर भाळलेले पालक मुलांना वातानुकूलित शाळेत भरती करतात. मुलांच्या वाढत्या वयातच जगण्याची क्षमता कमी करीत नेतात. हवेतून मिळणारा प्राणवायूच शाळेतल्या वर्गात शिरत नसेल तर मग विद्यार्थी जगणार तरी कसा? मानवी फुप्फुसांचा काही टक्के भाग केवळ प्राणवायू घेण्यासाठी सज्ज असतो. त्यातल्या दोन-चार टक्केसुद्धा प्राणवायूचा साठा कमी झाला तरी मेंदूवर ताण येतो आणि सारासार विचार करण्याची क्षमता क्षीण होत जाते. प्राणवायूला दिवसभराचा घटस्फोट दिल्यानंतर त्याचा ताण सर्व काही ढासळत नेतो. म्हणून तर प्राणवायूचा साठा योग्य प्रमाणात मिळावा म्हणून प्राणायाम आणि कपालभातीचा मार्ग आद्य ऋषीमुनींनी सांगितला असावा.
प्राणवायू हे आत्म्याचे अन्नच आहे. आजकाल प्रत्येक आॅफिसमध्ये एसी असतो. दिवसभर एसीत राहिल्यानंतर फुप्फुसाला प्राणवायूचा पुरवठा मिळणार तरी कसा? यातून मग आरोग्याची घसरणच होत जाते. आजकाल खिडकीबंद घरांची अपार्टमेंट म्हणजे फूल एसी रेसिडेन्सी निर्माण होत चाललीय. हॉस्पिटलची संख्या का वाढत चाललीय याचे कारण वातानुकूलित हेही आहे. घराच्या खिडकीतून येणारा प्राणवायू हा हिरव्या जीवाणूतून तयार झालेला असतो. या हिरव्या पेशीच प्राणवायूचा कारखाना चालवत असतात. प्राणवायूचे मुख्य काम कार्बन जाळणे, पेशींना नवे कार्बनीरेणू तयार करायला मदत करणे, तोच प्राणवायू जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरून परतवून लावत असू तर मग हॉस्पिटलशिवाय भविष्यात दुसरा मार्गच उरणार नाही. आधुनिक जगाने आता तरी डोक्याच्या खिडक्या उघडून प्राणवायूला हृदयाशी कवटाळलं तरच जगविणारं हृदय सतत चालू राहील.