ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांना उत्सुकता लागलेली असते तो दिवाळी सण आता साजरा होत आहे. बुधावारी या सणाचा महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तर घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया..
लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी करायचे असते. लक्ष्मीपूजन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६.०२ मिनिटांपासून ते रात्री ८.३५ मिनिटापर्यंत शुभमुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या वेळी लक्ष्मीचे प्रतीक असणा-या झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे.
तसेच बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४३ ते ८.०८ मिनिटांनी शुभ, सकाळी १०.५८ मिनिटे ते १२.२३ मिनिटे चल, दुपारी १२.२४ मिनिटे ते १.४८ मिनिटे लाभ, दुपारी १.४९ मिनिटे ते ३.१३ मिनिटे अमृत आणि सायंकाळी ४.३८ मिनिटे ते ६.०१ मिनिटे शुभ या चौघडीमध्ये वहीपूजन व लेखनास प्रारंभ करावा, असे सोमण यांनी सांगितले.
पुढच्या वर्षीच्या दीपावलीसंबंधी माहिती देतांना सोमण म्हणाले, की २०१९ मध्ये दीपावली ११ दिवस अगोदर येणार असून रविवार, २७ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन एकाच दिवशी येणार आहे.
लक्ष्मीपूजनाचे महत्त्व
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.