माणसे भूतकाळात रममाण होऊन वर्तमान व भविष्य दोन्ही दुःखात परावर्तीत करत आहेत. भूतकाळातील अपयशावर वर्तमानकाळाच्या यशाने फुंकर घालून भविष्य उज्वल करण्याची कला आत्मसात केली पाहिजे.
माझा तो स्वभाव आहे अनावर ।तुज देता भार काही नोव्हे ।।
जुन्या पिढीतील काही व्यक्ती नव्यांना कटू आठवणीत ओढतात. व अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमा प्रमाणे आयुष्यभर त्याचेच व्रण अंगावर बाळगतात. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या घरात रोज श्लोक पाठ करून आजोबांना व आजींना म्हणून दाखवायची शिस्त होती. तेव्हा कंटाळा यायचा. मी नाही म्हणायचो श्लोक . तेव्हा आजोबा रागवायचे मग मी शिल्लक राहिलेले सर्व श्लोक देखील पाठ करून म्हणून दाखवायचो. मग आई नेहमी तिचे ठेवणीतील वाक्य म्हणायची 'बूँद से गयी वो हौद से नही आती' तो बुंद एकदा मनातून पडला की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी उपयोग काय ? काय म्हणायचं या मानवी स्वभावाला.
संत तुकाराम महाराजांनी देव आणि प्रारब्ध याबाबत उपदेश करताना म्हटले आहे.
देह तव आहे प्रारब्ध अधीन ।याचा मी कांधीन वाहू भार ।।
काय तुझी ऐसी वेचत एक गाठोडे या उक्तीप्रमाणे मानवी मन भूतकाळाची गाठोडे घेऊन फिरत असतो. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग, एका गृहस्थांशी संभाषण बंद झालेलं होतं. जेव्हा जेव्हा तो व्यक्ती दिसतो तेव्हा आपल्याला तोच प्रसंग आठवतो. कटू आठवणी अगदी अधिकच घट्ट होत जाते.या काही वर्षात माणसं बदललेली असू शकतात. हा विचार करणे एवढेच उदार आपण नसतो. म्हणून कटू आठवणी तिथे सोडून देणे हाच उत्तम उपाय असतो. ती कुरवाळत ठेवू नये. आपल सुदैव की आपण खूप जुनी भरणारी जखम वागवत फिरणारा अश्वस्थामा नाही. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचा ते त्यालाच माहीत. दुःख काय असतं ते त्यालाच माहित त्याला तो शाप आहे. पण आपल्याला तरी अशी शक्ती नाही. मग अश्वत्थामाच दुःख विनाकारण का मागून घ्यायचं?
आयुष्याच्या पटलावरून वाईट गोष्टी पुसून टाकून नवीन आठवणींना जागा उपलब्ध करून द्यायला हवी. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर जाणीपूर्वक पुसून टाकायला हव्यात. स्मृतिकोशात काय ठेवायचं आहे ज्याला समजलले तोच खरा विवेकी. भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवून देऊ नये. येस्टरडे इज हिस्टरी, टूमारो इज मिस्ट्री, टुडे इज द गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेंस इट इज कॉल्ड द प्रेसेंट. रात्री झोपताना आपण टोचणारी अलंकार जसे काढून ठेवतो. तश्याच टोचणार्या आठवणीही मनातून काढून ठेवाव्यात. आणि दुसऱ्या दिवशी फक्त अलंकार घालावेत. प्रत्येक सकाळी तन आणि मन मोकळे स्वच्छ निर्मळ असेल तरच आपणास हेवा वाटेल.
- डॉ. भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातुर