- डॉ. अभिजित देशपांडे; इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com
स्वप्नांचा अर्थ नेमका काय होतो, याबाबत प्रत्येकालाच उ्त्सुकता असते. हजारो वर्षांपासून स्वप्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न झाला आहे. स्वत:ला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्याची अनेकांना जबरदस्त उत्सुकता असते. त्याकरिता पैसे मोजण्याचीदेखील तयारी असते. इंटरनेटवर तुमच्या स्वप्नांचा अर्थ लावणाऱ्या अनेक साईटस्, डिक्शनरी उपलब्ध आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे पॉर्नसाईटच्या खालोखाल या जागांवर हिटस् आहेत! अर्थात भारतामध्ये अनेक ठिकाणी ‘स्वप्न ज्योतिष’ सांगणारे आढळतातच.
सर्वप्रथम भारतामध्ये प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळातील संत/विचारवंत यांनी स्वप्नांचा कसा अर्थ लावला आहे, ते पाहूया. ऋग्वेदात स्वप्नांचे कारण ’वरुण देवता’ मानली आहे. ही देवता तुमच्या पाप/पुण्यानुसार स्वप्ने देते. थोडक्यात बक्षीस/शिक्षा असा सोपा मामला आहे. पुढच्या काळात अथर्ववेदात “कृष्ण शकुनी”, “हर्ष शकुनी”असा स्वप्नांचा उल्लेख आहे. भविष्य काळातील घटनांची सूचना म्हणजे स्वप्ने असा त्याचा अर्थ आहे. संस्कृत भाषेमध्ये शकुन म्हणजे पक्षी असाही एक अर्थ आहे. त्या काळात पक्ष्यांचे आवाज, दर्शन यांना महत्त्व द्यायची पद्धत होती. भारद्वाज पक्षी हा शुभ मानला गेला आहे, तर घुबड अशुभ मानले गेले आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्वप्नांचे अर्थ लावण्यावर दिसून येतो. उपनिषदांच्या काळात आणि त्यांच्यापासून निर्मिलेल्या श्रीमद् भागवतामध्ये स्वप्ने ही तिसरी चेतन अवस्था मानली गेली आहे. ब्रम्ह आणि माया यामुळेच स्वप्ने पडतात.
रामानुजन यांनी ब्रम्हसूत्रांवर भाष्ये केली आहेत. त्यातही “ब्रम्ह आणि माया” हेच स्वप्नांचे कारक, असे म्हटले आहे; पण लगेच दुसऱ्या सूत्रात “भविष्य” दाखवणारे असेही वर्णन केले आहे. रामायणातील “सुंदर कांडात” त्रिजटेला पडलेले स्वप्न याचे प्रमाण घेण्यात आले आहे.पुराण काळामध्ये मात्र स्वप्नांचे अर्थ सांगणे आणि त्यावर उपाय सुचवणे याला बहर आला आहे. अग्निपुराण आणि गरुडपुराण यात सगळ्यात जास्त उल्लेख आढळतो.
अग्निपुराणात वर्णन केलेली काही स्वप्ने भविष्यात धोका दाखवतात. उदाहरणार्थ शरीरावर गवत उगवणे, मुंडण केले जाणे, लग्न, सापास मारणे, तेल पिणे, माकडांबरोबर खेळणे, देव, ब्राह्मण, राजा अथवा गुरूने रागावणे. त्यावर उपायदेखील सुचवले आहेत. (यज्ञ करणे, वरुण, विष्णू, गणपती अथवा सूर्याची प्रार्थना आदी.) काही स्वप्ने शुभ मानली आहेत..