रमेश सप्रे
तसं गावही नाही नि मोठं शहरही नाही. अशा एका नगरात तो साधू अचानक आला. नगराच्या एका कोपऱ्यात सुंदर पिंपळाचं झाड. त्याच्याभोवती टुमदार पार. त्याच्यावर त्या साधूनं आपली पथारी पसरली. त्याचं सामान तरी काय तर एक चटई, एक चादर, अंगावर सदरा, खाली लुंगी, एक शाल पांघरलेली, एक दोन भांडी, बस! स्वत: रसोई करायची नाही. काही खायला मिळालं तरी ठीक नाही मिळालं तरी हरकत नाही. एक प्रकारची आयतीच वृत्ती होती त्याची. म्हणजे कुणाकडे कधीही काहीही मागायचं तरी भगवंताची इच्छा, अल्ला की मर्जी. चेह-यावर मात्र सदैव आनंद. निरागस हास्य, डोक्याला रुमाल बांधला असता तर लोक त्याला साईबाबाच समजले असते.
त्याच्या त्या शांततृप्त व्यक्तिमत्वानं भारावून जाऊन अनेक जण त्याला खाण्या-पिण्याच्या वस्तू, कपडे असं काही ना काही देत राहायचे. तो साधूही अगदी गरजेपुरतं ठेवून बाकी सगळं इतरांना देऊन टाकायचा. लोकही साधूचा प्रसाद म्हणून त्या गोष्टी स्वीकारायचे स्वत:साठी संग्रह न करण्याचं व्रतच होतं त्याचं. लोकांना उपदेश करणं, मार्गदर्शन करणं असलं तो काही करत नसे. अनेक जण आपल्या अडचणी त्याला सांगायचे त्यावर तो थोडा समुपदेशन केल्यासारखं बोलत असे, अनेकांचं त्यामुळे समाधान होत असे.
त्याचे दोन शब्दप्रयोग काहींना आवडायचे तर काहींना बिलकुल पटायचे नाहीत. तो काहीही घडलं, कुणी काहीही सांगितलं तरी म्हणायचा, ‘ठीक आहे, हरकत नाही.’
त्या नगरात एक तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्नाच्या आणाभाका (शपथा) झाल्या. शारीरिक संबंधही सुरू झाले. तिच्या घरच्यांना याची कल्पना नव्हती तर त्याच्या घरच्यांची या संबंधाना मान्यता नव्हती. ठाम विरोध होता. ज्यावेळी ती तरुणी गर्भवती झाली नि तिनं लग्न करण्याचा आग्रह धरला तेव्हा तिच्या प्रियकारानं हात वर केले. ‘मी लग्न करू शकणार नाही’ असं निश्चित सांगितलं. काही महिन्यानंतर त्या तरुणीच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिनं रागावून विचारलं, ‘कुणाचं पाप पोटात वाढवतेयस?’ त्या तरुणाचं नाव सांगितलं तर त्याच्या घरचे त्याला नि तिला दोघांनाही ठार करतील. या भीतीनं तिनं आईला चाचरत सांगितलं, ‘पारावरच्या साधूबाबांचं पाप वाढतंय तिच्या गर्भात’
तिची आई तरातरा त्या साधूकडे गेली नि अर्वाच्य शिव्या देऊ लागली. सारे लोक जमा झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. रागही आला; पण त्या तरुणीची आई शांत झाल्यावर नेहमीप्रमाणे एवढंच म्हणाला ‘ठीक आहे, हरकत नाही’ त्याचा चेहरा नेहमीसारखाच आनंदी होता. काही दिवसांनी ती बाळंत झाल्यावर तिच्या आईनं त्या नवजात बालकाला आणून साधूबुवांसमोर ठेवलं नि म्हणाली, ‘निस्तरा आपलं पाप’ शांतपणो साधुबुवाचे उद्गार होते ‘ठीक आहे, हरकत नाही’ गावातल्या इतर काही महिलांच्या सहकार्यानं साधू पारावरच त्या बाळाचं संगोपन करू लागला. त्याला जोजवू लागला, गोंजारू लागला.
काही दिवसांनी त्या तरुणाला पश्चाताप झाला. त्याचं प्रेम होतंच त्या तरुणीवर. आपलं बाळ असं अनाथ मुलासारखं वाढतंय हे पाहून त्यानं घरच्यांचं मन वळवलं नि तिनं आईला खरा प्रकार सांगितला. मग काय? सारे जण साधूबाबाकडे आले. त्याचे पाय अश्रूंनी धुवून त्याची क्षमा मागितली आणि अत्यंत लाडाप्रेमानं आपल्या बाळाला घरी घेऊन गेले. ते निघाले त्यावेळीही साधूबाबा तेच म्हणाले, ‘ठीक आहे, हरकत नाही’ त्याच्या आनंदाला अखंड भरतीच असायची. ओहोटी कधी ठाऊकच नव्हती. अखंड आनंदाचं हे एक रम्य रहस्य आहे.
आनंदाचे जणू पासवर्डस आहेत हे. परवलीचे शब्द ‘ठीक आहे, हरकत नाही’ परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती शांत, समाधानी राखता येते. आनंदाच्या उसळणा-या कारंज्यात सतत सचैल स्नान करत मस्त मजेत जगता येतं याचा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे?