- सदगुरू श्री वामनराव पै
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.
घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडकरयांनी विनोदाने लिहिले ते आज वस्तुस्थिती झालेली आहे. नाटक सिनेमामध्ये दारूला प्रतिष्ठा दिलेली आहे. टीव्हीवर मी एक सीन पाहिला त्यांत दारू पिताना एका पेगने काय होते आहे असे तो म्हणतो व त्याला इतर दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे. ज्यांना खायला अन्न मिळत नाही, रहायला घर नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ही मंडळी खरेच दु:खी असे मी म्हणेन. हयांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय. हे दारिद्रय का आले हयालाही अनेक कारणे आहेत. दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात. अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकारही जबबाबदार आहे. ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची? चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे. नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होता नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे. एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.
सांगायचा मुद्दा आपल्या देशात हे होत नाही. आपल्याकडे हे बोलण्याचे धाडसही कुणात नाही. कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही. तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत| ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत| तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन, शिक्षण, संवर्धन हया सर्व गोष्टींची जबाबदारी तुमचीच आहे. हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही त्यांना जन्म दया. हे करता येत नसेल आणि जर तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील व तसे जर त्यांनी विचारले तर त्यांना दोष कुणी दयायचा. मुलांना जर जन्म दयायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म दया अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.
क्रमश: