- प्रा. शिवाजीराव भुकेलेबुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा पांघरलेल्या अनेक आधुनिकांचा संत साहित्यावर प्रमुख आरोप आहे की, ‘संत साहित्य’ हे ‘संथ’ साहित्य आहे. ज्याचे संसारात सर्व काही संपते, तो संतांच्या ग्रंथांकडे वळतो. ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ असा निष्क्रिय भाग्यवाद व ‘आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना’ असा भाबडा व हताश नियतीवाद संत साहित्यात आहे. अशा आशयाची विचारप्रणाली एका बाजूला अतिभौतिकतावादाचे नको तेवढे स्तोम माजवित आहे. तर दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्याला शंभू मेळ्याची अवकळा आणणारी अनेक मंडळी तीर्थक्षेत्रांचे आणि देवी-देवतांची उंबरे झिजवित आहेत. या दोन्ही टोकांमधील एक सुवर्णमध्य संत साहित्याने अनेक शतकांपूर्वी काढला आहे, तो म्हणजे मानवी प्रयत्नाला ईश्वरी अधिष्ठान दिले की, आयुष्याची पाऊलवाट न अडखळता पार करता येते. याचा अर्थच असा की, ज्ञानोबा-तुकोबादी संत केवळ दैववादी नव्हते, तर पारमार्थिक क्षेत्रातही त्यांनी प्रयत्नवादाला महत्त्व दिले. तुकोबाराय तर प्रयत्नवादाचे बहुजनवादी खुले व्यासपीठच होते. मानवी प्रयत्नांचा पुरस्कार करताना एकापेक्षा एक सरस उदाहरणे देताना ते म्हणतात -ओले मूळ भेदी खडकाचे अंगअभ्यासासी सांग कार्यसिद्धी।नव्हे ऐंसे नाही कांही अवघडनाहीं कईवाड तोचि वरी।दोरे चिरा कापे पडीला काचणीअभ्यासे सेवती विष पडे।तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठांवजठरी बाळा वाव एका-एकी॥संत तुकोबारायांचा हा अभंग अभ्यासयोग व प्रयत्नवादाचा दीपस्तंभ आहे. खूप खतपाणी घालूनसुद्धा अनेक नाजूक रोपटी जास्त खत, पाण्यामुळे मरून जातात. तर ओडख्या-बोडख्या माळावर वाढलेले एखादे रोपटे खडकाला भेदून आपल्या जगण्यासाठी व दुसºयास हिरवीगार सावली देण्यासाठी जीवनरस शोषून घेतात. तद्वतच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली अनेक माणसे कालप्रवाहात नामशेष होतात, तर दारिद्र्याची श्रीमंती घेऊन जन्माला आलेली अनेक माणसे आपल्या प्रयत्नाने व अभ्यासाने काळाच्या मानगुटीवर पाय देऊन कालाजयी होतात. कारण पुन्हा-पुन्हा प्रयत्न करणे हीच खरी सिद्धी आहे, हा तुकोबांचा विचार विद्यापीठ, प्रशासन, स्पर्धा परीक्षा इ. क्षेत्रांतला खरा संजीवक मंत्र आहे. ‘निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ’ हा त्यांचा वज्रनिर्धार त्यांना ‘दैववादा’पासून निश्चितच दूर नेण्याचे काम करतो. भलेही तुकोबांचे काही अभंग त्यांच्या हाताश मनोवृत्तीला प्रकट करणारे असतील, पण ती तर तुकोबांच्या मनोवृत्तीची क्षणिक अवस्था आहे. आपण नाही का अनेक वेळा स्पर्धा परीक्षेच्या मांडवाखालून नवरदेव न होताच परत येतो आणि पंचगंगा नदीच्या काठावर आत्महत्या करण्यासाठी जातो; पण आत्महत्या न करता पुन्हा परत येऊन ‘तुका म्हणे नाही ऐंसे कांही अवघड’ या निश्चयाने पुन्हा प्रयत्न करायला लागतो. हाच भाव ज्ञानोबा-तुकोबांनी पारमार्थिक क्षेत्रातील प्रयत्नवादाच्या बाबतीत प्रकट केला. निष्क्रीय,आळशी, कामचुकार व दैववादी माणसाला संसारातही पैलतीर गाठता येत नाही आणि परमार्थात तर काहीच साध्य होत नाही. दुर्दैवाने आज स्वशोधाची आनंदयात्रा आणि दैववाद यांची सरमिसळ करून दैववादालाच अध्यात्म समजण्यात येतेय, त्यामुळे संतांच्या अभ्यास योगाऐवजी दैव योगाचीच अधिक चर्चा होते. अभ्यासयोग हाच सर्वश्रेष्ठ योग आहे, असे प्रतिपादन ज्ञानोबा माउलींनी केले आहे.
ओले मूळ भेदी ...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:56 AM