संस्कृत महाकवींमध्ये राजा भर्तुहरी हा त्याच्या काव्यातील सुलभता, वास्तवता आणि सखोल विचार आशयता यामुळे आजही तो चिरतरुण कवी वाटतो. त्याने काव्याच्या अक्षरत्वाविषयी लिहिले आहे की, सुकृती, विद्वान आणि रससिद्ध कवीश्वर हा नित्य चिरतरुण असतो आणि त्याचे काव्यही. त्याच्या यशोमय शरीराला वार्धक्य आणि मरण याचे भय नसते. म्हणजे त्याच्या कवितेने तो केवळ चिरतरुणच नाही तर चिरंजीवही असतो. म्हणूनच दिक्कालाच्या मर्यादा सोडून तो पलीकडे जातो आणि कोणत्याही कालखंडातील रसिकांना तो आपला वाटतो.
प्रबंधासारखे एखाद्या विषयात बंदिस्त न राहता आपले काव्य लहान लहान पदात मुक्त ठेवून संस्कृतमध्ये मुक्तक काव्ये जन्माला आली. कालिदासाने काही मुक्तक काव्ये लिहिली, परंतु मुक्तक काव्याला खरी लोकप्रियता मिळाली ती महाकवी राजा भर्तुहरीमुळे. राजा भर्तुहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचारप्रवाहांचा एक त्रिवेणी संगम आहे. भर्तुहरीचे नीतिशतक हे व्यवहारनीती सांगणारे एक प्रभावी मुक्तक काव्य आहे. भर्तुहरी हा राजा होता. राजविलासाचा उपभोगही त्याने घेतला होता. म्हणून शृंगाराची अनुभूती त्याच्या काव्यात होती. पण राजनीतीचीही पूर्ण जाणीव या काव्यांमधील अनेक श्लोकांतून व्यक्त झाली आहे. या नीतीशास्त्राला समाजनीती, राजनीती आणि अध्यात्मनीती याचा सुरेख समन्वय आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि वास्तववादी आहे. ‘शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी।’ या काव्यश्लोकाचे वामनपंडितांनी केलेले भाष्य मागच्या पिढीपर्यंत अनेकांच्या ओठावर होते.
‘चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनीला जरा। पद्मावीण जले निरक्षरमुखी जो नेटका गोजिय। दात्याला धनलोभ नित्य वसते दारिद्र्य विद्वजानी। दुष्टांचा पगडा महिपतीगृही, ही सात शल्ये मनी।’ भर्तुहरी सांगतो, दिवसा निस्तेज झालेला चंद्र, कमलहीन सरोवर, निरक्षर सुंदर मुखे, नेहमी संकटात अडकलेला सज्जन आणि राजगृहात दुर्जनांचा प्रवेश तसेच वावर ही सात शल्ये माझ्या मनाला कायम लागून राहिली आहेत. सामाजिक आनंदाला पारख्या करणाऱ्या या सात उणिवा आहेत त्या आजच्या काळालाही सुसंगत आहेत. दुसरे म्हणजे उपद्रवमूल्य प्रस्थापित करणाºयाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे हे आठवे शल्य नाही का? आज जर भर्तुहरी असता तर आजची शल्येही त्याने तितक्याच प्रभावीपणे मांडली असती हे निश्चित.
- डॉ. रामचंद्र देखणे