डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मानवी मनाचे कोणतेही कार्य सिद्ध होण्यासाठी मनाची पवित्रता, निष्कपटता महत्त्वाची असते. मनाच्या पवित्रतेचे साधन जप-साधना आहे. जपाने मनाची अवस्था बदलत राहाते. जप-साधनेमुळे मनुष्याला ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करते. आत्मविश्वासाने केलेले कार्य प्रगतीकडे धाव घेते. आत्मविश्वास दृढ असला की मोठमोठी कार्ये साध्य होतात. असीम धैर्य उत्पन्न होते. मग माणूस उच्चतर सत्याकडे झुकतो. उत्तमाकडून अत्युत्तमाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आत्मविश्वास दृढ झाला की मनात चिरंतन प्रेम, अविचल स्थिती निर्माण होते. मग आचार-विचार बदलून जातात. उन्नतीच्या मार्गावर आपली वाटचाल होते.
चुकीच्या मार्गाने आपले पाऊल टाकत नाही. मनामध्ये दयेचा पाझर फुटतो. संकुचित कृती न राहता विशालवृती बनते. कोणत्याही व्यक्तीला समजावून घेण्याची शक्ती निर्माण होते. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आत्मप्रवृत्तीवर अवलंबून असते. आत्मप्रवृत्तीत बदल झाल्यास जीवन जगण्याची स्थिती सुधारते. छल-कपटाचे आपण खेळ खेळत बसत नाही. सत्यता, प्रामाणिकता आपल्याला उच्चस्तरावर पोहोचविते. म्हणून मनाला नेहमी सत्याच्या मार्गावर घेऊन जावे. कारण प्रत्येक गोष्ट मनावरच अवलंबून असते. म्हणून मनाने सुदृढ असले की जगातल्या कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतो. मन:शक्तीमुळेच माणसाचे वा राष्ट्राचे पुनरुत्थान झालेले आढळते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, कोणत्याही व्यक्तीला किंवा राष्ट्राला थोर होण्यासाठी आपल्या चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास असावा लागतो. तो चांगुलपणा मनावर अवलंबून असतो. कारण मनाचे मोठेपण मनावरच असते. मनाचे मनपण बदलले की, स्त्री-पुरुष मतभेद राष्ट्र-राष्ट्रामधील मतभेद यातच मनुष्य अडवून जातो. त्यामुळे मनाने गंभीर असले की इच्छाशक्ती प्रकट होते. इच्छशक्ती प्रकट झाली की मनाच्या पाठीमागे धावते. मनाचा हा खेळ भले-भले जाणू शकले नाहीत. याला जाणले की मग सर्व जाणले. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा अर्जुनाला सांगितले होते. ‘‘तू मन हे मीचि करी-माझ्या भजनी प्रेमधरी’’ मगच तुला चराचरात माझ स्वल्प दिसेल. त्या मनाला माझ्याकडे वळव मग तुझे सव कार्य सिद्ध होईल.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)