शाश्वत आनंद भगवंतावाचून कुठेही मिळणे शक्य नाही. त्यामुळे इतर कारणाने शाश्वत आनंद शोधण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. शाश्वत आनंदासाठी, मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे; आणि त्यासाठीच, आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दु:खात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तू रहितच असतो. आनंद जोडणाºया गोष्टींचा आपण विचार करूनच नामस्मरण करावे. काल जे झाले त्याबद्दल दु:ख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि मिळालेला वेळ व्यर्थ गप्पागोष्टीत न घालविता नामस्मरण करावे !नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ‘गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम. एकदा का नामाची तळमळ लागली कि ते घ्यायला जीव आसूसतो. नामाचा शास्त्रशुद्ध अभास,मनन,चिंतन व्हायला हवे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दु:ख करण्याची वेळ येणार नाही. जगात सर्वात श्रेष्ठ नारायणाची आराधना आणि उपासना आहे. सद्संकल्प मनातून कधी जातील, हे सांगता येत नाही, त्यामुळे मनात एखादा सद्संकल्प आला की तो करून टाकला पाहीजे. हीच गोष्ट विचारांच्या बाबतीत लागू पडते.
-शून्यानंद संस्कारभारतीसंस्कार सेवाश्रम, खामगाव.