जागृती म्हणजे निव्वळ जागे असणे नव्हे. मानसिक, वैचारिक, शारीरिक सर्व पातळीवर सर्व क्षमतांनी संवेदनशील असणे म्हणजे जागृती. प्रत्येक पावलावर आपण सावध असणे हीच जागृती आहे. अध्यात्म हे सतत जागे राहण्याची प्रेरणा आपल्याला देते. ज्याला सुखी व्हायचे आहे त्याला जागे व्हावेच लागेल, अध्यात्म आपल्याला जागे करते. साधना सतत जागे ठेवते. प्रत्येक कर्म जागृतीने केले की तीच ईश्वराची पूजा होते. जागृतीत काय नाही? तिथे सुंदरता आहे. सहजता आहे. स्नेह आहे आणि सुखच सुख आहे.प्रत्येक मनुष्य बोलताना ‘मी’ आणि ‘माझे’ अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्ये असतात. ‘माझे’ या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात ‘मी’चे कर्तत्व परमेश्वरप्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तत्व देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. ‘कर्तव्य’ याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे; असा आहे.मनुष्याने ‘मी’आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. मी चे कर्तत्व करीन; पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आत-बाहेर गोड असावे.अंतर्मुख होणं, आपल्या जगण्यातील विसंगती दूर करण्याचा अभ्यास करणं आणि जीवन ध्येयसंगत व्हावं, यासाठी बाह्? आणि आंतरिक पालटाला अनुकूल होणं; हीच खरी साधना आहे. ही साधना करण्यासाठी रोजच्या दिवसातला वेगळा वेळ काढायला नको. सर्व जीवनव्यवहार पार पाडत असतानाच ही साधना साधायची आहे.
-वेदातांचार्य श्री राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा.