- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची मलिनता दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा महिमा गायीला जातो. तीर्थक्षेत्र मानवाच्या आंतरप्रक्रियेत बदल घडवतात. तीर्थक्षेत्रावर स्नानकुंड, घंटा, शंख, मूर्ती इत्यादींचा जवळून परिचय होतो. स्नानकुंडावर स्नान केल्याने बाह्य मल नाहीसा होतो. घंटा व शंखध्वनीमुळे आत्मिक ऊर्जा मिळते. त्या घंटेच्या व शंखाच्या लहरींची कुंपणं तयार होतात. त्यातून मानसिकतेत बदल घडतात. आत्मस्फूर्ती निर्माण होते. मानसिक रोग बरे होतात. ती ऊर्जास्पंदने शरीराला घातक असणाऱ्या जीवजंतूंपासून संरक्षण करतात. त्या पहाटेच्या लहरींनी मज्जारज्जू ताजेतवाने होतात. आत्मस्थितीत बदल घडवतात. मनोबल उंचावण्यात मदत करतात.निरोगी आयुष्यासाठी शंखध्वनीची ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. पूर्वीचे साधू किंवा पंडित उघड्या अंगाने मूर्तीसमोर पवित्र अंत:करणाने ध्यान लावत. त्या ऊर्जावलय वातावरणात त्यांचे मन प्रसन्न होऊन जात असे. म्हणून प्राचिन व जागृत अवस्थेतील तीर्थक्षेत्रावर आजही प्रसन्नतेची अनुभूती मिळते. पूर्वीच्या तीर्थक्षेत्राची शास्त्रीय पद्धतीने रचना केली गेलेली आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रांचा मोठा गवगवा केला आहे. मनाची ऊर्जा केंद्रे म्हणून तीर्थक्षेत्राकडे पाहिले जात होते. कारण आपल्या वैदिक धर्मातही मूर्तिपूजा ही अनादिकालापासून आहे. वेदामध्ये उद्रगीय, दहर, शांडिल्य, मधू इत्यादी उपासना सांगितल्या आहेत. पुराणकाळापासून रामकृष्णादी मूर्तीची उपासना सुरू झाली.प्राथमिक भक्तिस्वरूप प्रकट करायचे असेल तर मनात कुठलीतरी प्रतिमा समोर ठेवूनच भक्ती केली जाते. ज्याला प्राकृतभक्ती म्हणता. वारकरी संप्रदायामध्येसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या उपासनेची पद्धत आहे. पंढरपूरचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख आहे. स्वत: शंकराचार्य महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल ‘परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम्’’ ज्ञानदेवांच्या भाषेत ‘नेणो ब्रह्म मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आले’’ अशा परब्रह्ममूर्ती वारकरी संप्रदायात उपास्य दैवत म्हणून ओळखले जाते. सर्वच ब्रह्मरूप मानणा-यांना मूर्तीतही ईशस्वरूप दिसते. फक्त आपल्या मनाचा भाव पक्का असावा लागतो. मनच परब्रह्मस्वरूप बनवले पाहिजे. म्हणजे ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ याची जाणीव होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाव धरा असे संतांनी सांगितले. ते तीर्थक्षेत्र किती महत्त्वाची भूमिका निभावते ते वरीलप्रमाणे सांगितले आहे.तीर्थव्रती भाव धरी रे करुणा ।शांती दया पाहुणा हरी करी।।- संत ज्ञानेश्वर(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)
जागृत तीर्थक्षेत्रांवर प्रमलतेची अनुभती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 7:20 AM