- ह.भ.प. भरतबुवा रामदासी
मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून एवढाच विचार आहे. परंतु मानवी देहात सत्कर्म करीत देहातून देवा पर्यंत जाता येते. असे. मानवाचा दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान होते, त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो.
प.पू. पारनेरकर महाराज म्हणाले -जगावे जगावे नेटाने जगावे.. मरावे मरावे हितालागी..!
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करु नाश आयुष्याचा..!
ही संतवचने माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. जगतांना सत्कर्म करण्याचा उपदेश करतात. आजश शेतकरीकर्जबाजारी होतो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकानेनष्ट करतो. खरं तर, अध्यात्म शास्त्रात असं सांगितलं आहे की -
आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. या पापातून मुक्त होता येत नाही. तो अतृप्त आत्मा त्याच देहात भरकटत राहतो. त्याला गती नाही. आपण मात्र अविचाराने हे पाप करत असतो. एक माणूस सोडून दिला तर, कुठलाही प्राणी कधीच आत्महत्या करीत नाही. वादळी वारे येते, कधी जल प्रलय होतो, अशा आपत्तीत कोणता प्राणी जीवन संपवतो..?
घरटे उडते वादळात.. वारुळात पाणी शिरते..!कोणती मुंगी, कोणते पाखरु सांगा आत्महत्या करते..? निर्धाराने जिंकू आपण.. पुन्हा यशाचा गड..!
कुणीही आत्महत्या करू नका. हा सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकाने नष्ट करू नका. हा देह परत मिळणार नाही. आलेले दिवस निघून जातील, धरणी माता परत पिकेल, फुलेल पण गेलेला देह पुन्हा मिळेल का...? त्यामुळे विवेकाने जगा...!
समर्थ रामदास स्वामी म्हणतात -जीवनाचे सार विवेक विचार. दुजा आविष्कार नाही काही.!
संतांनी आम्हाला आनंदाने जगण्याचा मूलमंत्र शिकवला.
निर्धाराच्या वाटेवर.. टाक निर्भीडपणे पाय..!तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय!!
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.)