- ब्रह्मकुमारी नितामनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण संपन्नतेची इच्छा बाळगतो. या इच्छांना अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच दुसरी जन्म घेते. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात, तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या, अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या, या अट्टहासापोटी आपण उपवास करतो. कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार, तर कधी आणि काही... खरंच असे उपवास करून आपल्या या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.काही गोष्टी परंपरागत चालत आल्या. त्या आपण स्वीकारल्या. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेयाचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशिन आहे. त्यालाही विश्रांतीची गरज आहे. जसे पिठाची गिरणीही आठवड्यातून एक दिवस बंद ठेवतात, तसेच आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी, या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून, या शरीररूपी मशिनचे ऑइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल. मनोविज्ञानात सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले, तर ती गोष्ट मिळू शकते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली, तर हे प्रकर्षाने जाणवते की, हे मन काही क्षणासाठीसुद्धा स्थिर राहत नाही. एकाग्रतेची कमतरता असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो. जर स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल, तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.
सुखी, समाधानी व्हायचंय?; विचारांचा उपवास करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 4:08 AM