-ब्रह्मकुमारीविश्वासाच्या आधारावर वाईट वृत्ती किंवा सवयी असलेल्या मनुष्यांमध्येसुद्धा खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकतो. विश्वासाच्या पाठीमागे आपली शुभभावना, श्रेष्ठ वृत्तीची साथ जर एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर हा खूप मोठा सहयोग आपण त्याला देत आहोत. कितीतरी वेळा आपण बघतो माणूस विविध मुखवटे घालून कार्य करतो ज्यामुळे त्यांची खरी ओळख, खरा स्वभाव समजण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी द्यायला लागतो. अशावेळी स्वत:चीच खरी ओळख काय हे त्यालाच समजत नाही. मी असा का? हे थोडं थांबून स्वत:ला विचारण्याची नितांत गरज आहे. जी आपली भावना आहे तीच भावना त्या व्यक्तीच्या मनात पेरली जाते. मग ती प्रेमाची असो वा द्वेषाची. जर नकारात्मक भावना पोहोचू शकतात तर शुभभावनांचा ही परिणाम होऊ शकतो. शुभ भावनांनी तुटलेली नाती परत जोडू शकतो. वस्तू, पदार्थ, धन यांच्यापेक्षा मला हे नातं महत्त्वाचं आहे हे स्वत:ला पटवून देण्याची आवश्यकता आहे. आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो, ‘मीच का?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते हे आपण लक्षात ठेवावे. बुद्धिजीवी मनुष्य जेव्हा एखादे कार्य बुद्धीच्या स्तरावर करतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या बुद्धीवर होतो. पण तीच गोष्ट जर हृदयाच्या स्तरावर केली तर दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श होतो. म्हणून सांगितले जाते, कोणतेही कार्य करा पण मनापासून करा. मग ती प्रार्थना असो, जेवण असो किंवा अभ्यास असो. त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते.
स्पंदन; स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 3:49 AM