- डॉ. दत्ता कोहिनकर
मित्रांनो, वॉशिंग मशिनमधून धुऊन झालेले कपडे बाहेरच न काढता मशीनमध्येच ठेवले तर त्याला घाण वास येऊन ती दुर्गधी तुम्हाला असह्य करेल . आपल्याला कोणीतरी प्रचंड दुखावल ; बैचेनी, अस्वस्थता, व्याकुळता, द्वेष, क्रोध, अपराधीपणाची भावना , प्रेम, अशा अनेक भावनिक विचारांनी मनात अस्वस्थता आली , घालमेल सुरू झाली . त्या विचारांचे मजल्यावर मजले तुम्ही मनातच व्यक्त करीत राहिला , ते विचार तुम्ही व्यक्त केले नाही , बाहेर काढले नाही . भावनांचे कल्लोळ मनातच दाबून ठेवले तर त्या दमन केलेल्या भावना आपल्याला बेचैनी व नैराश्याकडे नेतील व हे दमन आज ना उद्या अक्राळविक्राळ रूप धारण करून नको त्या गोष्टी घडतील . म्हणून मनात दबलेल्या भावना , विचार योग्य व्यक्तींसमोर व्यक्त करा . योग्य पार्टनर शोधा जो तुम्हाला मोकळं होण्यास मदत करेल व तुमच्या विषयी निकष न लावता सर्व गुप्त ठेवेल. त्यालाही तुम्ही मोकळं होण्यास मदत करा .एकमेकांच लक्ष देऊन पूर्ण ऐकून घेतलं तरी माणस मनानी हलकी होतात . हे करत असताना वेळ पडल्यास त्या व्यक्तीला मिठी मारा ( *जादू की झप्पी ) , हात हातात घेऊन पूर्ण समरस होऊन तिला ऐका. ती रडावयास लागली तर पूर्णतः रडू द्या . दोघांनीही एकमेकांना ठराविक वेळ देऊन असे सेशन घ्या . फक्त 'भावनिक एकमेकांत अडकू नका . कारण आसक्ती , दुःखाचे कारण आहे*. परदेशात यासाठी काही संस्थांनी स्वमदत गट केले आहेत . यात स्त्री पुरुष दोघेही सामील होतात. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. माझ्या मित्राच्या आईला मी वेळ देऊन तिला पूर्ण बोलते केले ,हातात हात घेऊन तिचे ऐकून घेतले . मिठी मारल्यावर ती ओक्साबोक्सी रडली.ती आज मोकळी झालीय . कुकरची शिट्टी दाबू नका . आतील वाफ रुद्र रूप धारण करून स्फोट होऊ शकतो . म्हणतात ना , मुझे कुछ कहना है , मुझे भी कुछ कहना है । मित्रांनो वेळीच व्यक्त व्हा , अर्थात ढक्कन खोलून टाका. यामुळे मनाची सबलता व निर्मलता वाढते .