भगवंत जरी एकमेकाद्वितीय असले तरी ते स्वत: असंख्य रुपांमध्ये प्रकट होतो. जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध सेवा करण्यास पार्षदही अवतरीत होतो, असा वेदांत उल्लेख आहे. वेदांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. भगवद् भावना वाढीस लावणे व धर्मतत्त्वांचे पालन करणे यासाठी भगवंत अवतीर्ण होतात.विशुद्ध भक्तांच्या दु:खाचे ंनिवारण करण्यासाठीच प्रत्येक युगात भगवंताचे रुप नानाविध रुपाने प्रकट होते. शके १७९९ माघ वद्य सप्तमी (२३ फेब्रुवारी १८७८) रोजी श्री गजानन महाराज शिवगाव (शेगाव) येथे माध्यान्हसमयी वटवृक्षाखाली प्रकट झाले. देदीप्यमान कांती, अजानबाहू, प्रसन्न मुद्रा, विशाल भाळे, तेजस्वी डोळे, मायतीत निजानंदमूर्ती, दृष्टी दोन्ही भुकुटीमध्ये चढलेली, हातात कच्च्या मातीची चिलिम, वय ऐन तारुण्याभितरी, अंगात बंडी या अवस्थेत उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात असताना बंकटलालांच्या दृष्टीस पडले. या दिवशी पातुरकरांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. बंकटलालांना या क्षणापासून श्रींचा ध्यास लागला. एकदिवस शिवमंदिरात कीर्तन सुरु असताना त्याच श्लोकाचा उत्तरार्ध मंदिराचे ओट्यावर बसलेल्या श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत राहायचे. हात गुडघ्यापर्यंत, देहयष्टी सडसडीत, हातांची बोटे लांबसडक, चेहरा विलक्षण गंभीर, नाक सरळ व तरतरीत, डोक्यावर फारसे केसं नसत, दाढी व मिशी क्वचित वाढलेली, वर्ण सावळा, चाल वायुसमान ‘गण गण गणात बोते’ सतत मुखी असायचे. अहिराणी भाषा व वºहाडी भाषा यातून तार्किक सुसंवाद असायचा. कधीकधी कानडी, हिंदी, इंग्रजी भाषेतूनही तर्कसंकेत करायचे. श्री गजानन महाराज स्वयंभू भजनं म्हणायचे.‘गितै पुस्तं बोबैधु रामा...चित्ते पुस्तं बोबैधु रामा...’गणात गण बोटंग बोटंगजटंभू रामू पिस्तंभू रामू....ऐष्मिस्तंभ वैदूही...’अशा प्रकारची भजनं श्री वारंवार गुणगुणत.बोटावर बोटे आपटुन चुटक्या वाजवणे त्या तालांवर अव्याहतपणे जप करणे ही श्रींचीनेहमीची सवय असायची. कधी बोटांमधून रक्तही ओघळायचे याचेही भान महाराजांना नव्हते. महाराजांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात एक प्रकारची गती होती. महाराज जे काही बोलत तो एक तार्किक संदेशच असायचा. मनुष्य वाणीसम महाराज कधीच बोलत नसतं. श्रींना कुणी गणपतबुवा, गणीबाबा, गणेश, गजानन, गजाननबाबा, अवलियाबाबा अशी संबोधना करायचे. पुढे श्री गजानन महाराज हे नाव भक्तांमध्ये रुढ झाले.कानिफनाथ हत्तीच्या कानातून प्रगट झाले, गोरक्षनाथ उकीरड्यामधून प्रगट झाले, अशीच काहीशी अवस्था होऊन श्री गजानन महाराज प्रगट झाले, असं श्री दासगणू महाराज काव्यरचनेतून व्यक्त करतात. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज अनंत योग समाधीतून वारुळातून प्रगट झाले. येथूनच समर्थांनी जगाचा उद्धार केला. पुण्य योगात्मे सूक्ष्म अवस्थेत प्रगट होऊन जगाचा निरंतर उद्धार करतात. श्रींनी अगणिक लिला केल्यात. श्रींच्या लिलांमधून मानवी समाजाला संदेशच आहे. उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खाता अन्न हे पूर्णब्रम्हं आहे, हे वाया घालवू नका, हा महान संदेश दिला. भास्कर पाटलांचा अहं निमवून कोरड्या विहिरीस पाणी लावले. बंकटलालांनी काडी धरताच चिलिम पेटली. अग्निदेवता प्रगट झाली. मधमाशांचे काटे योगबलाने बाहेर काढले. कठीण समयी कोण कामी येतो, ही शिकवण दिली. पाटील पुत्रांचे मन:परिक्षण करुन भक्तीभावाची ज्योत अखंड तेवविली. त्यांना प्रेमभराने भक्तीरसाचे अमृत पाजले. दांभिक गोसाव्याचा गर्व नष्ट केला. ‘नैनं छिन्दन्ती शस्त्राणी...’ या श्लोकाचे कलियुगात प्रात्यक्षिक दाखविले. द्वाड घोडा, द्वाड गाय शांत केली, कावळ््यांना पुन्हा न येण्यास सांगितले.पितांबराने धावा करताच सुक्या आम्रवृक्षास पालवी फुटली. गंगाभारतीचा कुष्ठ बरा झाला. नर्मदामातेने सर्वांचे संरक्षण करुन श्रींचे दर्शन घेतले. लोकमान्य टिळकांनी भाकरीच्या प्रसादाने गीतारहस्य लिहिले. सद्भक्त कंवरांची चूनभाकरी गोड केली. बापूंना काळेस विठ्ठल रुपात दर्शन दिले. रामचंद्र पाटलांना दृष्टांत दिला. असे कित्येक चमत्कार श्रींनी केले. जया गावी वसेल संत। तेथे पुण्य करील पापांचा अंत। उद्धरोनि जाय प्रांतचा प्रांत। दु:खे होती देशोधडी।। उणे दिसे ते पूर्ण करी। जगाचा तोल बोधे सावरी। परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरी। चमत्कारी संत ऐसे।। असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेमधून संबोधतात. श्री गजानन महाराज स्तवनांजली (हिंदी, मराठी) चे लिखाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेले आहे.अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज एकदिवस ‘बाबा येणार, आज माझा बाबा येणार’ असा अविरत तर्कसंकेत केला. भक्तांच्या हे लक्षात आले नाही. माध्यान्हसमयी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्थित वटवृक्षाखाली भक्तांसमवेत निवांत बसलेले असताना श्री स्वामी समर्थांनी मोठ्याने आरोळी ठोकली ‘माझा बाबा आला’ समोरुन एक तेरा चौदा वर्ष वयाचे दिगंबर अवस्थेतील बालक श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी येऊन त्या बालकाने लोळण घेतले. समर्थांनी त्या बालकास प्रेमभराने आलिंगन दिले. दोघांच्याही डोळ्यांमधून नेत्रधारा वाहू लागल्या. हे पाहून भक्तही गलबलले. श्री स्वामी समर्थांनी दिगंबर योगी बालकास देव मामलेदारकडे जाण्याचा निर्देश केला तेथून नाशिकला जा व पूर्वेकडे बस चाळे करीत, असा संकेत केला. असं म्हटल्या जातं गुरु शिष्यामध्ये पुर्णतया शक्ती संक्रमण करुन जगाचा उद्धार करवून घेतात, हे बुद्धीपलीकडील सामर्थ्यांविषयी कल्पना न करणेच बरे.श्री गजानन विजयग्रंथ पारायणातून प्रत्यक्ष प्रसंग डोळ््यासमोर उभे राहतात. श्री दासगणू महाराजांच्या लेखणीतील सामर्थ्य भक्तांच्या नजरेसमोरुन तरळते. अकोटस्थित नरसिंग महाराजांच्या चरित्रलेखन प्रसंगी श्री गजानन महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन श्री दासगणुंनी घेतले. ज्यादिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे लिखाण पूर्ण झाले. त्यादिवशी परतीच्या प्रवासासाठी निघण्यापूर्वी श्रींच्या समाधीचे दर्शन श्री दासगणू महाराजांनी घेतले. यावेळी श्री दासगणू महाराज बराच वेळ श्रींच्या मूर्तीसमोर अश्रु पुसत उभे होते.आजही श्री लाखो भक्तांच्या हाकेला धावून जातात. ‘हत्ती झुलतील, मुंग्या येतील’ हे श्रींचे संकेतात्मक वचनाचा प्रत्यय आज येतो. श्रींचा महिमा वर्णन करणे शक्य नाही. ‘नाम, श्वास जप चाले निरंतर, तथा ठाई धाव घेई श्री गजानन’ आज श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त दोन शब्दांची ओंजळ श्री चरणी अर्पण.।। जय गजानन ।।
- अॅड. श्रीकृष्ण रामकृष्ण राहाटे