Ganesh chaturthi 2018 : 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. सर्वांना त्याच्या आगमनाची ओढ लागली असून सध्या सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्तीभावाने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. जाणून घेऊयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी...
पूजेचा शुभ मुहूर्त
बाप्पाच्या प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार. त्यानंतर दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता.
पूजेचे साहित्य -
हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्र, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
पूजेसाठी आवश्यक तयारी -
1. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. 2. मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. 3. प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात.
अशी करा मूर्तीची प्रतिष्ठापना -
1. पहिल्यांदा कपाळी टिळा लावावा.2. देवापुढे पान-सुपारी विडा ठेवावा.3. देवाला नमस्कार करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेऊन पुजा सुरू करावी. 4. पूजेसाठी बसताना आसनावर बसावे. 5. हातात अक्षता घेऊन मनोभावे गणेशाचे नाव घेऊन अक्षता गणेशाच्या चरणी अर्पण कराव्यात.6. श्रीगणेशाचे नाव घेऊन कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावी.7. गणपतीच्या नावावर दुर्वा किंवा फुलांनी पाणी शिंपडावे. 8. गणपतीच्या चरणांवर गंध, फूल, अक्षता आणि पाणी अर्पण करावे. 9. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात.10.गणपतीच्या मूर्तीला गंध लावावे, हळद, शेंदूर, फुलं, हार, कंठ्या, दुर्वा वाहाव्यात.11.धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.12. गणपतीला नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. 13. देवासमोर पानाचा विडा ठेवून त्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावं आणि त्यावर फूल वाहावं.14. देवच्या आरतीला सुरूवात करावी.