डॉ. दत्ता कोहिनकर-
आज लॉकडाऊनमध्ये आपले वयोवृद्ध आई-वडील घरात बसून बोर झाले असतील .त्यांचा ताणतणाव दूर करण्यासाठी त्यांच्या जुन्या मित्र-मैत्रिणींचे, नातेवाईकांचे, पूर्वीच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नंबर मिळवून त्यांना फोन लावून द्या. बघा ते किती आनंदी होतील.मित्रांनो, आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे यापेक्षा दुसरे महत्तम कार्य काय असू शकते ? चला तर मग , त्यांना मोकळे व तणावमुक्त होण्यासाठी पुढाकार घ्या व घरातील वातावरण आनंदी करा. आपण सर्वजण व्हॉटसअॅप , फेसबुक डिजीटल मिडीयाच्या साह्याने जगाशी कनेक्ट आहोत. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये आपला वेळ जातोय . पण आपल्या आईवडिलांना टीव्ही शिवाय मनोरंजनाला साधनच नाही. तेथे सारख कोरोना, कोरोना ऐकून ते अस्वस्थ होतील. म्हणून त्यांना मोकळ होण्यासाठी हा उपक्रम राबवा व त्यांची सेवा करा.
खरंतर आपल्या अवतीभवती ''अशा '' माणसांची संख्या दिवसेंदिवस इतकी झपाट्याने वाढते आहे. ज्यांच्याकडे आलिशान गाडी, बंगला, सर्व सुखसोयी यांच्यासह सर्वप्रकारची स्थिरता आहे. यातही वेदनादायी बाब त्यांच्या वाट्याला कुठली आली असेल तर ती एव्हड्या मोठ्या विशाल जगात एकटी आहेत. त्यांच्याजवळ रोजच्या छोट्या छोट्या संवादासाठी माणसं नाहीत..कुणी कुणी तर तासन तास भिंतीकडे डोळे लावून शून्यात हरवलं आहे तर कुणी अंधाऱ्या खोलीत एखाद्या नाटकातल्या स्वगताप्रमाणे पुटपुटत आहे. जी जगण्याची खरी पद्धत नाहीये.. ती सर्व माणसंच आहेत.. फक्त एकेकाळी माणसांपासून दूर गेलेली...त्यांचा आनंद त्यांना परत मिळवून द्या.. एवढं छोटं काम कुठल्याही माध्यमातून तुम्ही करू शकला तरी तुम्ही आयुष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर आणि अपयशाच्या खोल डोहात देखील आनंदी राहाल..
आयुष्य खूपदा नव्याने जगण्यासाठी नवनवीन संधी देत असतं..कुणी ते किती गांभीर्याने घेते, कुणाला संधीच ओळखता येत नाही.खूप उशिरा त्यांच्या लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते..माणूस आनंद एका क्षणात कमावू शकतो पण त्याला दुःख मिळवण्यासाठी खूप अपयश किंवा बोचऱ्या अनुभवातुन जावं लागते. अनुभव हा एकप्रकारे आयुष्याची पोकळी भरून काढण्याचे काम करत असतो. पण माणसाला आयुष्याने दिलेली संधी जर न कुरकुरता स्वीकारली तर तुमचं जगणं तर सुसाह्य होतंच शिवाय आपल्यासह खूप जणांच्या आनंदाची ती गुरुकिल्ली ठरू शकते.