विजयराज बोधनकर
आपल्या अवतीभवती पूर्णपणे आनंद भरला असताना वृत्तीने माणसं कौरवांसारखी का वागतात आणि जिथे मानवनिर्मित दु:खाची निर्मिती होते तिथे संस्कार, कृ ती, ज्ञान या आधारे काम करून जी माणसे गौरवाच्या योग्य ठरतात, ती माणसे का तशी असतात? हा संशोधनाचा विषय आहे. आताची अस्ताव्यस्त जीवनशैली कुणी निर्माण केली? अस्ताव्यस्त वागणं एक व्यसन असतं ते कशामुळे लागतं आणि या अस्ताव्यस्त विचारधारेमुळे स्वत:चं आणि समाजाचं किती नुकसान होत राहतं, हे लोकांच्या लक्षात कसं येत नाही? अगदी
पुराणकाळापासून दुर्योधन नावाची वृत्ती कशी काय अजूनही कार्यरत आहे. इतकी वर्षं भगवतगीतेचं पठण करूनही वृत्तीचं दमन का होत नाही? शैक्षणिक क्षेत्रात कॉर्पोरेट वृत्तीची बिनचेहऱ्याची माणसं शिरलीत आणि संस्कारमय शिक्षणाचा तेजोमहाल कसा निस्तेज करून टाकला, याही क्षेत्रात दुर्योधन वृत्तीने धुडगूस कुठल्या कारणामुळे सुरू केला? जीवनाला आधार आणि आकार देणारी विचारधारा जाऊन आर्थिक विकार आणि बाजारू शिक्षणाचा कल कशामुळे वाढला? आपल्याच मातृभाषेचं खच्चीकरण करून इंग्रजीच भाषा कशी व्यावसायिक जीवनाला उपयुक्त आहे ही विचारधारणा कुठल्या पोकळीतून जन्माला आली? विशीच्या आत असलेल्या वयोगटाला आपलीच मातृभाषा निट वाचतासुद्धा येत नाही आणि म्हणून भारतीय जीवनशैलीचं, परंपरेचं इतकं खच्चीकरण होत चाललंय हे अजूनही अनेकांच्या लक्षात का येत नाही? असे शेकडो प्रश्न अनेकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतात. म्हणजे बºयापैकी अनेकांची मने आतून धुमसत असताना दिसत मात्र असते. एका तेवीस वर्षांच्या तरुणाला कामाच्या अतिताणामुळे ब्रेनस्ट्रोक आला. ही जीवघेणी आर्थिक स्पर्धा वाढीस लागली आणि या मोहमायेच्या जगापासून वैचारिक अध्यात्म हळूहळू दूर चालल्याची भावना पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागलीत. निसर्गापासून दूर गेलेली आणि सिमेंटच्या थंडगार कृत्रिम वातावरणात वाढणारी पिढी धिम्या पावलाने का होईना शांतीच्या शोधाकडे आकर्षित होऊ लागलीत. अती लोभामुळेच महाभारताचं युद्ध पुकारलं जाऊन कौरववृत्तीचा नायनाट आणि शेवटी विचारांच्या गौरवशाली परंपरेला आधार देणाºयांचा विजय झाला. असत्याच्या मार्गावरून माणूस कितीही दूर गेला तरी यू टर्न घ्यावाच लागतो आणि शांतीच्या महाद्वारात उभं राहावंच लागतं. म्हणूनच काही वर्षांपूर्वीच तुकोबारायांनी अभंग रचला. ते म्हणातात, ‘अरे फजितखोर मना किती तूज सांगो, नको लागू कुणा मागे मागे’ या अभंगातूनच खूप काही शिकण्यासारखं मात्र नक्कीच आहे. शापित वृत्तीच्या महामार्गावरून कमविलेली धनराशी शेवटी शापितच ठरते. त्या धनातून उभारलेले महाल, बंगले शेवटी ढासळून पडतात, उद्ध्वस्त होतातच. भ्रष्टाचार अंधाराला घेऊन चालत राहतो तर आचारविचार नेहमीच प्रकाशाला घेऊन चालत असतो. मनाला भुरळ पाडणारी चमकती मयसभाही शेवटी एक दिवस उद्ध्वस्त होते. त्या खोट्या जीवनशैलीपासून दूर राहण्यासाठीच थोडा वेळ तरी निसर्ग तत्त्वासोबत ध्यानमग्न अवस्थेत राहिलं की सत्य-असत्याचा नकळत खुलासा होत जातो. स्वत:चीच स्वत:वर कृपा होणं म्हणजे शांतीच्या महाद्वारात परतण्यासारखं आहे आणि समाजाने ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.