- शैलजा शेवडे
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत़ बाप्पाची आरास म्हणजे एक वेगळंच सुख़ त्यामुळेच कुठल्याही व्रताची कहाणी वाचताना सर्वप्रथम गणेशाची कहाणी वाचावी लागते. त्यातील एक ओळ मनात ठसलीच. ‘मनाचा गणेश मनी वसावा...’ मनाचा गणेश...म्हणजे काय... गणेश, गणपती आम्हाला त्याचे रूप माहीत आहे. हत्तीचे तोंड असलेला, लंबोदर, एकदंत, चतुर्भुज, याहून वेगळे काय असेल त्याचे रूप... पण जितका म्हणून त्याच्या रूपाचा विचार करत गेले, तितका तो माझ्यासाठी अवघड बनत चालला... मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. रामदासांनी सांगितलं आहे असं...निर्गुणाचा आरंभ म्हणजे काय? तो ओंकारस्वरूप आहे... निर्गुण इथे सगुण रूपाला येते आणि इथूनच निर्मितीला सुरुवात होते. तो मुळारंभ... तो ब्रह्मणस्पती आहे. तो खरोखर ब्रह्म आहे... जे आनंददायी असतं, जे चिरंतन असतं, ते ब्रह्म... अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. संगीताला नादब्रह्म म्हणतो, साहित्याला शब्दब्रह्म म्हणतो... गणपतीला का ब्रह्म म्हणायचं... नक्की तो कसा आहे... गणपतीच्या रूपाबद्दल माझ्या मनाचा प्रवास सुरू झाला. तो ब्रह्मांडात आहे, तसाच चैतन्यरूपाने आपल्या शरीरात आहे... जाणवेल त्याचे अस्तित्व? पृथ्वीच काय, आकाश, अवकाशही व्यापून आहे... तो इथेही असणार... एका वेगळ्या अनुभूतीने अंग थरथरलं... गणेशा, नक्की कसा आहेस रे तू...?एक ध्येय ते, तुला जाणणे, एक लक्ष्य ते, तुला शोधणे,गणाधीश हे, विघ्नहरा रे, उपासनेतून तुज आकळणे।एक ध्येय ते तुला जाणणे।कोणी म्हणती, महानाद तू, शब्दब्रह्म ओंकारस्वरूप तू,काय नेमका कसा असे तू, निर्गुणाचा अर्थ उमगणे।एक ध्येय ते, तुला जाणणे।स्तिमित करते रूप मनोहर, वक्रतुंड तू हे लंबोदर,गजमुख तरी अतीवसुंदर, रूपकांमधूनी तुला समजणे।एक ध्येय ते, तुला जाणणे।अनंत नावे तुझी गणेशा, कपिल विकट हे पूर्णपरेशा,सगुण, निर्गुण, प्रथमाधीशा, स्तवनातून तुज प्रसन्न करणे।एक ध्येय ते, तुला जाणणे।मूर्तिमंत तू ज्ञान गणपती, भ्रमित मन मम तोकडी गती,चिंतनातूनी, अंतरातूनी, आनंदाचा स्रोत मिळवणे।एक ध्येय ते तुला जाणणे।