- ह.भ.प. भरतबुवा रामदासी
या जगात परमेश्वर अवतार का धारण करतो? याचे उत्तर देतांना गीता माऊली म्हणते -परित्राणाय साधूनां । विनाशायच दुष्कृतां ॥धर्म संस्थापनार्थाय । संभवामि युगे युगे ॥
साधूंच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी व धर्माच्या संस्थापनेसाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो पण प्रश्न असा आहे की, अवतरणे म्हणजे नेमके काय..? खाली येणे का..? मग देव जर सर्वत्र आहे तर, तो खाली येतो म्हणजे काय..? देव अवतरतो म्हणजे काय..? माऊली म्हणतात,पै मूर्तीचेनि मेळे । तो मूर्तिच होऊनि खेळे ॥परि अमूर्तपण न मेळे । दादुलयाचे ॥
त्याच्या अमूर्तपणाला धक्का न लागता तो मूर्तरूपाला आला म्हणजे जो परमात्मा गोचर नव्हता तो इंद्रिय गोचर झाला. अवतार म्हणजे वेगळे काही नाही. अवताराचे प्रयोजन संपले तरी कार्य शिल्लकच राहते. देव विचार करतो की जे साधूही नाहीत व जे दुर्जनही नाहीत असे अज्ञानी लोक तर दु:खातच आहेत अशा लोकांचा उद्धार तर झाला पाहिजे. देवत्व न सुटता जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी मनुष्यरु पाने देवाने अवतार घेतला व समाज उध्दाराचे कार्य केले. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास,महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ब्रह्मसोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ॥किंवाआम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी ॥बोलिले जे ऋषी । साचभावे वर्ताया ॥
म्हणून संत हे ईश्वराचे अवतार आहेत. ते दिसायला मनुष्य असले तरी असायला देवच आहेत. देव अवतारात मर्यादित कार्य केले. संत अवतारात व्यापक कार्य केले. नृसिंह अवतारात भगवंताने फक्त हिरण्यकश्यपुला मारले पण संत अवतारात रेड्याच्या मुखातून वेद वदविले, भिंत चालवली, हरिपाठासारखे, ज्ञानेश्वरीसारखे, वाङमय निर्माण करु न जड जीवाचा उद्धार केला. देवाचा अवतार व्यक्ती उद्धारासाठी झाला. संताचे कार्य मात्र व्यापक आहे. संत जे अवतार घेतात ते सकल समाजाला मार्ग दाखवण्यासाठी व मार्ग प्रशस्त करण्यासाठी. जेव्हा निवृत्तीनाथ मार्ग दाखवतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा मार्ग प्रशस्त करतात. संताची कृपा अमर्याद आहे. तुकोबा म्हणतात,कृपादान केले संती । कल्पांतीही सरेना ॥संतांच्या कृपेचे वर्णन करताच येत नाही.तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वानू ॥
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, भ्रमणध्वनी - 9421344960 )