- प्रल्हाद वामनराव पै(जीवनविद्या मिशन)
‘देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांना उत्तम आरोग्य दे आणि देवा यांचे रक्षण कर’ असे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतात. त्यामुळे आपल्या मनात असलेले कोरोना संक्रमण, चिंता, काळजी आणि दु:खाचे विचार कमी होतील.
जीवनविद्या तत्त्वज्ञानातील एक क्रांतीकारक सिद्धांत म्हणजे ‘शरीर हे साक्षात परमेश्वर’. त्याचप्रमाणे जीवनविद्या तत्त्वज्ञान असेही सांगते की ‘शरीर हे एक दिव्य संगणक’ (Divine Computer) देखील आहे. वास्तविक कॉप्युटर हे एक मानवनिर्मित यंत्र आहे. मात्र शरीररूपी दिव्य कॉप्युटरची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे.
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की शरीराचा आणि कॉप्युटरचा काय संबध? याचे उत्तर असे की, कॉप्युटरला आपण जे फिडींग करतो त्याप्रमाणे कॉप्युटर आपल्याला रिझल्ट देत असतो. माणूसदेखील विचार, उच्चार आणि आचार या कर्माद्वारे शरीराला सतत फिडींग करत असतो. आपण जर कॉप्युटरमध्ये चुकीचे फिडींग केले तर त्यातून मिळणारा रिझल्टदेखील चुकीचा असेल. अगदी त्याचप्रमाणे शरीररूपी दिव्य कॉप्युटरमध्ये आचार, उच्चार आणि विचारांच्या माध्यमातून जर चुकीचे फिडींग केले गेले तर शरीर आपल्याला दु:ख स्वरूपात त्याचा रिझल्ट देते.
मात्र याउलट जर आपण जाणिवपूर्वक आपल्या शरीराला शुभ विचार, शुभ उच्चार आणि सत्कर्माचे फिडींग केले तर त्याचा परिणाम सुख स्वरूपात आपल्याला मिळू शकतो. दुसरा मुद्दा असा की, ज्याप्रमाणे आपण स्वत:च्या शरीररूपी कॉप्युटरला सतत फिडींग करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपण इतर लोकांच्या शरीररूपी कॉप्युटरलादेखील फिडींग करत असतो. म्हणजेच सर्व लोक सतत स्वत:च्या आणि इतरांच्या शरीररूपी कॉप्युटरला फिडींग करत स्वत:चे अथवा इतरांचे जीवन घडवत अथवा बिघडवत असतात. माणसाला व समाजाला जर सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवूनच विचार, उच्चार आणि आचार करायला हवेत.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे घरात एकत्र असूनही कुटुंबात चिडचिड आणि भांडणतंटे वाढलेले आढळत आहेत. घराबाहेर भितीचं वातावरण आणि घरात कौटुंबिक कलह अशी बिकट परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगते की, समाजातील प्रत्येकाने सद्य परिस्थितीत सतत सकारात्मक आणि सहकारात्मक विचारांचे फिडींग या दिव्य कॉप्युटरला द्यायला हवे. कारण तुम्ही जे फिडींग करणार त्यानुसार तुमचे जीवन घडणार आहे. यासाठी थोर तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै निर्मित ‘विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना’ घरातील सर्वांनी एकत्र येऊन म्हटल्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.
विश्वप्रार्थनाहे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य देसर्वांना सुखात आनंदात,ऐश्वर्यात ठेवसर्वांचं भलं कर, कल्याणकर, रक्षण करआणि तुझे गोड नाम मुखातअखंड राहू दे.
या नकारात्मक परिस्थितीवर मात या सोबतच सर्वांच्या भल्यासाठी प्रत्येकाने सरकारने दिलेल्या सूचनादेखील तंतोतत पाळणे गरजेचे आहे. घरात सुरक्षित वातावरणात राहून सर्वांसाठी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करत या नकारात्मक परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे.त्याचप्रमाणे सध्या कोरोना महामारीला नष्ट करण्यासाठी समाजातील अनेक लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सफाई कामगार, प्रसारमाध्यमातील कर्मचारी असे अनेक लोक या संकटकाळातही स्वत:चे कर्तव्य उत्तमपणे बजावत आहेत.
या सर्वांबद्दल समाजातालील प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीदेखील या काळात घरातच राहून स्वत:चे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि इतरांच्या कुटुंबीयांसाठीदेखील कृतज्ञता व्यक्त करणारी ही साधना करावी. सतत ‘देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांना उत्तम आरोग्य दे आणि देवा यांचे रक्षण कर’ असे म्हणून ते ही कृतज्ञता व्यक्त करू शकतात. ज्यामुळे त्यांच्या मनात असलेले कोरोना संक्रमण, चिंता, काळजी व दु:खाचे विचार कमी होतील. अशा पद्धतीने कोरोना नामक हे वैश्विक संकट दूर होऊन लवकरच सुखाचे, ऐश्वर्याचे आणि आरोग्याचे दिवस परत येतील.