आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुख हरवून बसल्याची जवळपास सगळ्यांचीच भावना आहे. अगदी श्रीमंतातला श्रीमंत असो वा गरिबातला गरीब सगळ्यांचीच अवस्था सारखीच आहे़ आपल्या आयुष्याची सुरुवात शाळेपासून होते. शाळेत असताना आपल्याला असं वाटतं की, महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्याला जास्त आनंद मिळेल. पण महाविद्यालयात गेल्यानंतर जाणवतं की, शाळेतच खूप मजा होती. महाविद्यालयानंतर ग्रॅज्युएशन, नोकरी, लग्न, मुले अन् परिवार यामध्ये आयुष्याचा निम्मा काळ व्यतीत होतो़ म्हणजे वयाच्या पन्नाशी-साठीला आल्यावरही आपल्याला शाश्वत सुख कशामध्ये आहे, हे उमगत नाही. म्हणजे आपल्याला असा अनुभव येतो की, आयुष्यात काही केल्या शाश्वत सुख मिळत नाही.
तुम्ही काहीही करा ते सुख काही काळापुरतेच राहते़ त्यानंतर आपल्याला ते सोडून दुसºया गोष्टींचा ध्यास लागतो़ पुन्हा पुन्हा तेच घडतं़ पण शाश्वत सुखाची हमी कशातूनच मिळत नाही़ म्हणजे बालपणी वेगळ्या अडचणी, तरुणपणी वेगळ्या अडचणी, प्रापंचिक आयुष्यात वेगळ्या अडचणी, म्हातारकाळात वेगळ्या अडचणी यात आपण वैतागून जातो़ पण आपण गांभीर्याने शाश्वत सुख कशात आहे याचा कधी विचारच करत नाही़ या संपूर्ण प्रवासात आपल्याला वेळच मिळत नाही़ कुणी सांगतपण नाही़ एकंदरीत खूप अवघड परिस्थिती आहे़ पण असे शाश्वत सुख खरंच असते का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो आणि जर असते तर ते कशातून मिळते त्यासाठी काय करावं लागतं? अशाप्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात़ शाश्वत सुखाचा मार्ग तो कोणता? यावर एकच रामबाण उपाय म्हणजे ‘भक्तिमार्ग’, जो आपल्या संतांनी दाखवलेला आहे़ आपल्या संतांनी त्याचे संपूर्ण आयुष्य भक्तिमार्गावरच व्यतीत केलं आणि आपल्याला पण त्यांनी भक्तिमार्गावर जाण्याचा उपदेश केला.
भक्तिमार्ग म्हणजे नक्की काय? कशासाठी ? आणि या मार्गामध्ये असं काय आहे की सगळेच संत आपल्याला भक्तिमार्गावर जायला सांगतात़ याचा शांतपणे विचार केला पाहिजे़ याचं कारण असे आहे की, या मार्गावरच शाश्वत सुख मिळेल, अशी संतांना खात्री आहे़ खात्री यामुळे आहे कारण त्यांनी तसा अनुभव घेतलेला आहे़ आता काहींना वाटेल भक्तिमार्ग म्हणजे आपली दैनंदिन कामे सोडून संन्यास घेऊन टाकणे, असा काही गैरसमज करून घेऊ नका़ आपले काम, संसार सगळ्याच जबाबदाºया पार पाडत फक्त देवाचे नाव अखंडपणे घेणे हाच खरा भक्तिमार्ग़ नावाने सुरुवातीला तुमचे मन शांत होईल़ हळूहळू आनंदाचा, प्रेमाचा झरा तुमच्या मनात वाहू लागेल आणि हळूहळू तो झरा शाश्वतपणे वाहू लागेल.
जर का असे झाले तर आपल्याला कोणाकडूनच आनंदाची, सुखाची अपेक्षा उरत नाही़ आपणच जर आनंदाने ओलेचिंब झाले तर आपण दुसºयांना देखील आनंदच देऊ आणि आपण वाईट मार्गापासून आपोआपच लांब जाऊ़ कारण वाईट मार्गावरचा असुरी आनंद फार काळ टिकत नाही आणि तुम्हाला त्याचा नंतर खूप त्रास होतो़ जेव्हा तुम्हाला भक्तिमार्गावर वाईट मार्गापेक्षा लाख पटीने जास्त आनंद मिळाला तर वाईट मार्गावर जाण्याचा प्रश्नच येत नाही़ भक्तिमार्गावर जात असताना तुम्हाला प्रापंचिक अडचणी येणारच आहेत़ त्यातून कोणाची सुटका नाही, म्हणजे आपण देवाची भक्ती केली, मग आपल्याला कोणत्याच अडचणी येणार नाहीत, हा एक गैरसमज आहे़ अडचणी येतीलच, पण त्यात आपल्याला देवाकडून खूप बळ मिळेल़ किती पण अडीअडचणी आल्या तरी तुम्ही खंबीर राहू शकाल़ त्यामुळे देवाचे नाव सतत घ्यावे, कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी चालतं़ कारण देव एकच आहे फक्त त्याची नावं वेगवेगळी आहेत़ जसं आपण मराठीत पाण्याला पाणी म्हणतो, इंग्रजीत त्याला वॉटर म्हणतात, पण पाणी एकच आहे़ जसं आपण माणूस एकच आहोत, पण आपल्याला दादा, पप्पा, ताई, सासरे बुवा, पिंटू, कृष्णा अशी भरपूर नावे आहेत़ त्यामुळे कोणत्याही देवाची भक्ती करा, पण अगदी मनाच्या देठापासूऩ - आशिष जाधव(लेखक हे आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार आहेत)