- ह.भ.प. भरतबुवा रामदासीअध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. ज्या साधकाच्या अंत:करणात भाव, निष्ठा, विश्वास, परमश्रद्धा असेल त्या साधकालाच परमेश्वराचे सगुण दर्शन होईल. भावाचा अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव प्रत्ययाला येणार नाही. भावातच ईश्वराचे अस्तित्व दडलेले आहे. भक्तीशास्त्रात भावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण म्हणाल भाव म्हणजे तरी काय..? तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात-प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधै: ॥प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे. अंत:करणात शुद्ध सत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे. देवाच्या प्राप्तीसाठी तीव्र अभिलाषेने चित्तात निर्माण झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम त्या परमप्रेमासच भाव असे म्हणतात.भगवंताबद्दल परमप्रेम असणे म्हणजेच भक्ती. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा ।भक्तीसाधनेत परमप्रेम असल्याशिवाय भगवंत सगुण दर्शनाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले -भक्ती एक जाणे । तेथे साने थोर न म्हणे ॥ आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥बहुतांशी लोकांना असे वाटते की, देव दिसत का नाही..? तो दिसत नाही याचाच अर्थ तो या जगात नसावा मग जो इंद्रिय गोचर नाही, बुद्धी गम्य नाही. जो तर्काच्या ताजव्यात तोलता येत नाही, त्याला मानावयाचे काही कारण नाही पण हा पाखंडी विचार करण्याचे काही कारण नाही. अध्यात्मशास्त्र हे श्रद्धेचे शास्त्र आहे. स्वामी विवेकानंदांनी भगवान रामकृष्णांना विचारले, भगवान या जगात देव आहे का..? असलाच तर तो दिसत का नाही..? भगवान म्हणाले - नरेंद्रा..! आग पेटितल्या प्रत्येक काडीत अग्नी असतोच पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? दुधात तूप असतेच पण ते दिसते का..? नरेंद्रा... दुधातले तूप दिसण्याकरिता काही क्रिया प्रक्रिया कराव्या लागतील, नंतरच ते दिसेल.तुकाराम महाराज म्हणतात -दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित ।भावभक्तीच्या फुलांनी अंत:करणाची परडी भरली की सगळ्या आयुष्यालाच भक्तीचा सुगंध प्राप्त होतो. भावाची वाट वहिवाटली तर देहबुद्धी तुटेल, भवसिंधु आटेल, विवेक जागेल, पाखंड भंगेल, भास निरसेल, सद्वस्तु भासेल आणि भगवंत प्रगटेल अशा भावभक्तीच्या वाटेनेच देवाचे दर्शन होईल.
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, 9421344960)