- बा.भो. शास्त्रीस्वच्छ प्रतिमेची सर्वत्रच पूजा होत असते म्हणून विचारी माणसंं प्रतिमा निर्माण करत असतात. कदाचित त्यांंना घर नसतंं पण घरोघर त्यांंचे फोटो आपण पाहतो. त्यांच्याकडे पैसा नसतो, पण समाज पैसा खर्च करून त्यांचे जागोजागी पुतळे उभे करीत असतो. कदाचित त्यांंचे मंंदिरही बांधले जातात. कारण त्या पुरुषांंच्या चित्रात त्यांंचंं निर्मळ चारित्र्य असतं. तेच लोक ग्रंंथात, धर्मात, शब्दांंत दिसतात. मनात वसतात. मरणाला मारून ते आजही जिवंंंत आहेत. मलिन माणसं जे निर्माण करतात ते काळाच्या उदरात गडप होऊन जातं आणि तेजस्वी पुरुषांंचंं कर्तृत्व अमर होतंं. चिरंतन प्रकाश देतंं. चांगल्या वस्तूचंं स्वाभाविक आपल्याला आकर्षण असतं. कुणालाही प्रत्येक वस्तू शुद्ध हवी असते. दुधात, पाण्यात, फळात, विचारात, आचारात व उच्चारात भेसळ नको. फार काय दारू तर नाही पण विषही भेसळीचं नको असतं. पण हाच निकष आपण स्वत:ला कधीच लावत नसतो. सर्वांना सोयीचा माणूस आवडतो. आपण इतरांंच्या सोयीचं होण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. चोरी करणंं बेइमानी आहे हे चोरांना पण कळतं. म्हणून तो स्वत:साठी साथीदार इमानदार हवा अशी सगळ्याच चोरांंची अपेक्षा असते. मग माणसंं मळतात कशी? भौतिक जग निर्माण करणारा स्वत:ला का तयार करीत नाही. दुसरा आपल्यासाठी सज्जन असावा ही आपली अपेक्षा रास्त आहे. मग आपण पण याच्यासाठी सज्जन का असू नये? गीता म्हणते,‘‘आत्मौपम्येन सर्वत्र समंं पश्यति योर्जुनसखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत:’’स्वत:ला दुसऱ्यात पाहता येतं तो योगी आहे. आपल्याला दु:ख नको. त्यालाही नकोच असतं. आपल्याला सुख हवं तसंं त्यालाही हवं असतं. यालाच दृष्टी म्हणतात. डोळे सगळ्यांनाच आहेत. दृष्टी नाही. पाप व पुण्याचंं मूळ दृष्टीत आहे. बाहेरचं जग डोळ्यातूनच अंंतरात प्रवेश करतंं. दृष्टी व सृष्टीत सतत व्यापार चालत असतो. दृष्टीला नको ते नाकारता आलंं पाहिजे, हवंं ते स्वीकारता आलं पाहिजे. आधी दृष्टीलाच मळ लागतो. नंंतर मनात व्यापतो. मनातून बृद्धी व आत्म्यात पसरत जातो. माणसाचा जन्म होतो तेव्हा तो कोराच असतो. ना हिंंदू, ना मुस्लीम, ना जैन ना बौद्ध एकदम सफेद असते. आम्हीच त्यात जात, धर्म, पंथ व प्रांताचे रंग भरत असतो. जसा आभाळातून पाण्याचा थेंंब पडतो. तसाच स्वच्छ, मधुर, प्रसन्न व थंड असतो हा माणूस. बाळाचे डोळे पाहा, किती सुंंदर दिसतात. ते विकार विकल्परहित असतात. कवी भास्कर म्हणतात,‘‘जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्नतैसे रजस्तमी विहिन मन निर्मळ होआवे’’जमिनीतल्या वस्तूंंच्या गुणधर्माची जशी संगत मिळते तसं पाण्याचंं रंंगरूप बदलतंं. थेंंब आगीत पडला की जळतो. मातीत मुरतो, शिंंपल्यात मोती होतो, सागरात खारा होतो, दारूत दारू तर आमरसात अमृत होतो. गोड, खारट, तिखट, आंंबट, संजीवनी व विष ही त्याचेच बदललेली रूपं आहेत. हा सगळा संगीताचा परिणाम आहे. असंच आहे माणसाचं रेखाचित्र. त्यात आपणच रंग भरत असतो. कधी आईबाप, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी नातेगोते यांच्या सहवासात माणसं रंगत जातात. सत्संगात रमून जातात. कुसंगाने भंगून जातात. मन मळतं, बुद्धी मळते, यावर काही उपाय आहे की नाही?हेच श्रीचक्रधर सूत्रातून सांंगतात,‘‘उजळलेयाचेनी संगे मैळला उजळे’’घासनीच्या संगतीने भांंडं उजळतं. तुरटीच्या संगतीने पाणी शुद्ध होतं, अग्नीच्या संगाने लोखंंडाचा जंंग जातो. साबणीच्या संगतीत वस्त्र स्वच्छ होतं. अशीच मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात.
चारित्र्यवान माणसांचा सहवास इतरांसाठी परिसस्पर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 4:32 AM