डॉ . दत्ता कोहिनकर- हेनरी फोर्डने एका अनोळखी एजंटला स्वतःची पॉलिसी काढावयास दिली.हेनरी फोर्ड सारख्या उद्योगपतीची पॉलिसी काढावयास मिळाल्यामुळे त्या एजंटला झटक्यात लाख रुपये कमिशनपोटी मिळाले. एका रात्री तो एजंट लक्षाधीश झाला.पेपरमध्ये ही बातमी हेनरी फोर्ड च्या मित्राने वाचली व तो हेनरी फोर्ड ला फोन करून म्हणाला, अरे हेनरी आपला मित्र स्मित पण पॉलिसी चे काम करतो. त्याची आर्थिक स्थिती पण बिकट आहे .तु ही पॉलिसी काढावयास अनोळखी एजंट ऐवजी स्मीतला का नाही दिली? त्याची पण आर्थिक स्थिती सुधारली असती ना? त्याचवेळी डोक्याला हात लावत हेनरी फोर्ड म्हणाले , अरे यार स्मित मला कधीही बोललाच नाही . तुला तर माहित आहे मी किती व्यस्त असतो. तो जर मला पॉलिसीबाबत म्हटला असता तर ही पॉलिसी मी त्यालाच काढावयास दिली असती. मित्रांनो या गोष्टीतून मी एवढंच शिकलो की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काय हव आहे? हे तत्सम व्यक्तींना तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत त्यांना कळणार कसे? मित्रानो लोक मदत करायला तयार असतात .लॉक डाऊनच्या या काळात अनेक अडचणींचा सामना तुम्ही करत असाल व त्यामुळे अस्वस्थ असाल. म्हणून आपल्या लोकांना फोन करून अवश्य बोला. तुमच्या समस्या त्यांना सांगा. त्यांना मदत मागा .लोक मदत करायला सदैव तयार असतात. मदत मागायला अजिबात लाजू नका व मदत करायला देखील पुढे या .लक्षात ठेवा कधी कोणावर कसली वेळ येईल हे सांगता येत नाही म्हणून मदत मागा व मदत करा .
भगवान बुद्धांना भक्तांनी विचारलं , भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईन ? भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही केलेले सत्कर्म हेच तुमच्या कामाला येईल. म्हणून सत्कर्माची कास धरा.आपली सोसायटी ,आपला वाडा, आपला परिसर ,आपली मित्रमंडळी, आपला समाज , हे पण एक आपलं कुटुंबच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, '' हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला...''त्यामुळे समाजकुटुंबातील सदस्यांना मदत करा व मदत मागायला लाजू नका.