- विजयराज बोधनकरअनेक जण नाती जोडतात आणि नात्यांना शेवटपर्यंत टिकविण्यासाठी काळजी घेतात. अनेक मंडळी दिलेला शब्द पाळतात आणि विश्वास टिकवतात. व्यवसाय उभारतात आणि तो टिकवतात, अशी अनेक उदाहरणे देता येतील. हीच ‘टिकविण्याची कला’ सहावी कला होय. व्यक्तिमत्त्व निर्मितीसाठी तारतम्य ठेवून, भान ठेवून, जागृत राहून आपली समाजातली नेमकी भूमिका काय आणि ती भूमिका कशी टिकवायची याचे जो सतत चिंतन करीत राहतो तोच प्रगतशील मार्गावरून उत्तम प्रवास करू शकतो. उत्तम विचार, उत्तम गुणवंत माणसे, उत्तम आठवणी, सतत उत्तमच वागणे, उत्तम विचार जगाला देत राहणे, कामाचा दर्जा शेवटपर्यंत उत्तमरीत्या संभाळणे, आई-वडिलांचे शाश्वत संस्कार आणि समाजाचा या सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी आणि महत्त्वाची कला आहे. अशी माणसे कधीच वादग्रस्त ठरत नाहीत. डोळे बंद करून समाज अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतो. झाडे आपल्या फळांचा, फुलांचा दर्जा सहज टिकवून ठेवू शकतात त्यामुळेच त्यांची जग काळजी घेत राहते.ज्याप्रमाणे शकुनीमामाने द्यूतात विश्वास टिकविला नाही, कर्णाने दुर्योधनाची सोबत करून सत्याचा मार्ग टिकविला नाही, अशा प्रकारची माणसे समाजमनातून कायमची उतरतात आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला कायमचा डाग लावून घेतात; आणि जी माणसे या टिकविण्याची वृत्ती जोपासत या मार्गावरून चालत राहतात त्यांच्या आयुष्याचा शेवट अतिशय सुखात आणि आनंदात होतो. इतिहासात ज्यांनी म्हणून दगाफटका केला, सत्याचे अस्तित्व टिकविले नाही त्यांच्या नशिबी फक्त अंधारच आला; कारण त्यांनी सत्य टिकविले नाही, काचेच्या भांड्याला काळजीने सांभाळून ठेवले तरच ते टिकते तसे हे माणसाचे जगणे आहे, उत्तम संस्कार टिकविणे म्हणजेच देशाला प्रगतीच्या मार्गावरून चालविणे होय.
'या' सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी कला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:48 AM