- विजयराज बोधनकरसंपूर्ण जग हे आनंदाने भरलंय, तरीही घराघरात दु:खाचे डोंगर उभे आहेतच. स्व:बळावर नाव, धन, आरोग्य मिळविता येत असूनही अनेक माणसे भ्रष्टाचार करताहेत. ही पंचमहाभुते अनंत काळापासून मानवाचे नि:स्वार्थपणे पालनपोषण करताहेत तरी ही मानवाला त्याची किंमत का कळत नाही? सकाळचा सूर्योदय आनंद देतो. कशाचीही मागणी न करता पाऊस, वर्षा आणि शरद ऋतू हजेरी लावतो. भाद्रपद, अश्विन, कार्तिक महिन्यात निसर्ग हिरवागार होऊन मानवी डोळ्याला, मनाला न मोजता येणारा आनंद देऊन जातो. पुढे हेमंत शिशिर आणि वसंतऋतू आल्हाददायक हिवाळा प्रत्येक जीवाला आनंद देऊन जातो.जगण्यासाठी अन्न, राहण्यासाठी घर, देहासाठी वस्त्र इतक्याच खऱ्या मानवी गरजा. तरीही अधाशासारखा तो का मोहमायेच्या मागे मागे पळतोय आणि इतकं मिळवूनही शेवटी दु:खाच्या अप्रिय गोष्टी मनात ठेवून प्राण सोडतो. प्रिय आणि अप्रिय मानवी गुण संस्काराच्या वृत्तीतूनच जन्म घेत राहतात. परमेश्वर हा गमितानतेत दडला आहे. सत्य, शिव, सुंदर याची व्याख्या ज्याच्या लक्षात आली तो समाधानातले सुख काय असते ते अनुभवू शकतो. झाडावर फुललेले फूल जगण्याचे खरे तत्त्वज्ञान सांगू शकते. त्यातला उल्हासित सुगंध, रंग, लोभस आकार यातूनच नि:शब्दपणे कसे जगावे याचे उत्तर मिळत जाते.मानवी देहातले न दिसणारे मन जर फुललेल्या फुलासारखे बनत गेले तर त्या माणसाला सर्वत्र आनंद दिसायला लागेल. निसर्गशक्तीने निर्माण केलेल्या प्रत्येक बिजात त्याचं मूळ सुंदर रूप दडलं असतं. मनोबीजातून निर्माण झाल्या विचारफुलांची माळ निर्माण करायची की फक्त निर्माल्य बनू द्यायचं हे सर्वस्वी त्या त्या माणसाच्या हाती असतं. आनंदाची दालने सर्वत्र उघडी आहेत तिथे आपलं मन कुठलं पाऊल उचलतंय यावरती सर्व अवलंबून आहे. शेवटी प्रत्येक माणूस आपल्या सुखदु:खाचा शिल्पकार असतो.
मोहमाया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 3:05 AM