गुढीपाडवा उद्या म्हणजेच २५ मार्च रोजी आहे. पण उद्याचा गुढीपाडवा नेहमीच्या गुढीपाडव्याप्रमाणे असणार नाही. आपल्या सगळयांनाच माहित आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न फिरता गुढीपाडवा घरच्याघरी साजरा करता येणार आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी ऋतुचक्र बदलतं, शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. रामानं या दिवशी रावणाचा वध केला या आनंदातत गुढी उभी केली जाते असं त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे.
या दिवशी सगळ्या कटु आठवणी हेवे दावे विसरून नव्या वर्षाची नवी सुरुवात करायची असते. आनंदाची, मांगल्याची गुढी उभी करून तिचं पूजन करून नाव संकल्प करायचा असतो. सध्याच्या गंभीर परिस्थिती सर्व मार्केट्स बंद असणार आहेत. तेव्हा गुढीपाडव्याच्या पूजेला आवश्यक असेल ते सामान आपल्याला बाजारात उपलब्ध होईलच असं नाही. गुढी पूजनासाठी , बत्तासे, फूल, कडूनिंब मिळालं नाही तर काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेंशन घेऊ नका. मोहन दाते पंचांगकर्ते यांनी कशी गुढी उभी करायची याबद्दल दिलेली माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुढी उभारण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार नाही त्यामुळे घरात असलेले स्वच्छ रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून पूजन करावे, कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल , हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे , शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजाला प्रार्थना करावी. असं सांगितलं आहे. त्यामुळे गुढी उभारण्यासाठी फुलं किंवा इतर साहित्य नसल्याचे दुःख मनात ठेवता तुम्ही साध्या पध्दतीने गुढी उभारू शकता.
मुहूर्त
तिथी आरंभ - 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजून 57 मिनटे
तिथी समाप्ती - 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 26 मिनटांपर्यंत