चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. तसेच हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी अभ्यंगस्नान करणं, दाराला तोरण लावून पूजा विधीसह घरोघरी गुढी उभारली जाते. खरं तर गुढीपाडवा साजरा करण्याची अनेक कारणं सांगण्यात येतात. या दिवशी दृष्ट प्रवृत्तींच्या राक्षसाचा वध करुन भगवान श्रीराम अयोध्येत परत आले होते असं मानलं जातं. तसेच ब्रम्हदेवाने सृष्टीची याच दिवशी निर्मिती केली असंही मानण्यात येतं.
गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जात असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यावर स्वतिकचे चिन्ह काढून त्यावर रेशमी कापडसह गुढी उभारली जाते. तसेच घरातील मंडळी पारंपरिक पोशाखात गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. या दिवशी सुंदरकांड, रारक्षास्रोत्र, देवी भगवती यांच्या नावाच्या मंत्रांचा जाप केला जातो. जाणून घेऊया गुढी पाडव्याला गुढीची पुजा करण्याचं महत्त्व आणि पूजा कशी करावी याबाबत...
- गुढी उभारताना सर्वप्रथम अंगणात किंवा घरासमोर रांगोळी काढावी. तसेच गुढी ज्या ठिकाणी उभी करणार असाल तर त्या ठिकाणी स्वस्तिकचे चिन्ह काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
- गुढी उभी करताना ब्रम्हांडामधील शिव-शक्तींच्या लहरींना आवाहन करुन तिची स्वास्तिकावर उभारणी करावी. त्यामुळे गुढीला देवत्व प्राप्त होतं.
- जमिनीवर गुढी उभारताना घराच्या उंबरठ्यालगत ती थोडीशी झुकलेल्या अवस्थेत उभी करावी.
- आंब्याची पानं गुढीच्या टोकाला बांधली जातात. असं मानलं जातं की, आंब्याच्या पानांमध्ये जास्त सात्विकता असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
- गुढीला कडुलिंबाची माळ घालावी. असं मानलं जातं की, कडुलिंबांच्या पानामध्ये प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण असतात.
- गुढी उभारताना साडी आणि कलश असणं आवश्यक असतं. त्यामुळे कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होते.
- गुढीची पूजा करताना ब्रम्हदेव आणि विष्णु यांच नमन करावे.
गुढी शब्दाची उकल
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे. तसाच तो 'तोरण' असाही आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा.