- युवा कीर्तनकार, ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
गुरु म्हणजेच जो लघू नाही आणि जो लघूला गुरु बनवतो तो. जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघू अन् जो मनाचा स्वामी होतो तो गुरु. गुरु वजनदार असला पाहिजे. जीवनाच्या घसरत जाणाऱ्या प्रवाहातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु. कनक, कांता आणि कीर्ती ह्यांची वावटळ त्याला उडवू शकत नाही आणि म्हणूनच तो आपल्यासारख्या अस्थिर आणि अव्यवस्थित मनाच्या मानवासाठी मार्गदर्शक बनतो.
आज गुरुपूजा गुरुवादात परिवर्तित झालेली आहे. Guru Puja is turned into Guruism
गुरुपूजेचा गुरुवाद झाल्यामुळे मानव अंधश्रद्धा व अज्ञान ह्यांच्या अंधारात आदळत आपटत आहे. गुरुपूजेचे सुंदररित्या व सुगंधाने दरवळणारे पुष्प गुरुवादाने कोमेजून गेलेले आहे, कुस्करले गेले आहे. बाप डॉक्टर असला किंवा इंजिनिअर असला तर तेवढ्यावरुन आपण त्याच्या मुलाला ऑपरेशन करायचे किंवा घर बांधायचे काम सांगत नाही. ती कामे करण्यासाठी तशा प्रकारची योग्यता मुलाने देखील प्राप्त केली पाहिजे; याची आपण चौकशी करुन घेतो पण येथे मात्र परंपरेने गुरुच्या मुलाला त्याची योग्यता पाहिल्याशिवाय गुरु म्हणून स्वीकारतो. याच्यासारखी महान बालिशता दुसरी कुठली असू शकते..?
गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन. गुरुचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असले पाहिजे. ध्येयाचे साकार रुप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी त्याचा साक्षात्कार होतो. अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो.
अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवेनम: ॥
गुरुजवळ बसून 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया' गीत वचनानुसार शिष्य नम्रता, जिज्ञासा व सेवा ह्यांच्याद्वारे गुरूजवळ असलेले ज्ञानामृत पितो. गुरु हा तर शिष्याच्या जीवनावरील पेपर वेट आहे. याच्यामुळे वासनाच्या विचारांनी शिष्याच्या जीवन पुस्तिकेची पाने उडून जात नाहीत.
हिंदीमध्ये एका दोह्यामध्ये गुरु शिष्याच्या भूमिकेचे फारच सुंदर वर्णन केलेले आहे -
गुरु कुम्हार औ शिष्य कुंभ है, घट घट काढै खोट । अंतर हाथ सहार देत और बाहर मारै चोट ॥
गुरु कुंभार आहे आणि शिष्य कुंभ आहे. जसा कुंभार बारीक बारीक दोष शोधून मडक्याला नीट आकार देण्यासाठी धोपटतो त्याप्रमाणे गुरु देखील शिष्याच्या लहान लहान चुका दाखवून त्याच्या जीवनाला इच्छित आकार देण्यासाठी चापटी मारतो पण कुंभाराचा दुसरा हात कुंभाच्या आतून मायेने फिरत असतो तसा गुरूही शिष्यावर अंतः करणातून प्रेमच करीत असतो. गुरुच्या उपकारानी ज्याचे हृदय भरून आलेले आहे अशा कुणा कृतज्ञ मानवाने गायीले आहे की,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ॥
ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता; विष्णूप्रमाणे सद्वृत्तींचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संहारक तसाच जीव व शिव ह्यांचे मिलन करणारा गुरु हा साक्षात् परब्रह्मासमान आहे, अशा गुरुचे पूजन हे भारतीय संस्कृतीचे सुमधुर व भावार्द्र काव्य आहे.
गुरुजवळ पोचताच बुध्दी ग्रहण शील बनते. त्याचा सहवास च इतका मधुर असतो की, त्याच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. त्याच्या एका स्मिताने वर्षानुवर्षांचा थकवा दूर होतो. त्याची कृपादृष्टी पडताच मनाची मलीनाता दूर होते. अशा गुरूचे पूजन ही भारतीय परंपरा आहे. बुद्धीचे हिमालय गणू शकू असे श्रीमद् आदि शंकराचार्य देखील गुरूचे नाव ऐकताच भावार्द्र बनून म्हणतात -
दृष्टान्तो नैवदृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरोर्ज्ञानदातु: । स्पर्शश्चेतत्रकल्प्य स नयेति यदहोस्वर्णतामश्मसारं ॥
न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरु: स्वीय शिष्ये । स्वीयं साम्यं विधाते भवति निरुपमस्तेनवालौकिकोऽपि ॥
ज्ञान देणाऱ्या गुरूला देऊ शकू असा तिन्ही लोकात दृष्टांतच नाही. गुरु तर शिष्याला स्वतःचे गुरुत्व देतो आणि म्हणूनच शिष्याला स्वतःच्या प्रतिमूर्ती रुपात तयार करणारा गुरु हा निरुपम आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत; त्यांचा दूरध्वनी क्र. 87 93 03 03 03 )